महावितरण कर्मचाऱ्यांचा आज संप; वीज पुरवठ्यासाठी कंत्राटदारांकडून सेवा
जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी कृती समितीने खासगीकरण, पुनर्रचना आणि धोरणात्मक मागण्यांच्या विरोधात आज, ९ ऑक्टोबर रोजी एकदिवसीय संपाची हाक दिली आहे. या संपात जळगाव जिल्ह्यातील सुमारे तीन हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत.
या आंदोलनामुळे विजेच्या तक्रारींचे निवारण आणि अन्य कामकाजात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना गैरसोय होऊ नये, यासाठी महावितरण प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात एजन्सीच्या कंत्राटदारांमार्फत सेवा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.
कृती समितीच्या मागण्यांमध्ये पेन्शन योजना त्वरित लागू करणे, मागासवर्गीयांना पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नतीत आरक्षण देणे, तिन्ही वीज कंपन्यांमधील रिक्त पदे तत्काळ भरणे आणि महावितरणच्या चुकीच्या पुनर्रचनेला थांबवणे यांचा समावेश आहे.
हा संप पूर्णपणे ग्राहक आणि सामान्य जनतेच्या हितासाठी असून, कामगारांच्या कोणत्याही आर्थिक मागण्या यामध्ये नाहीत, असे कृती समितीने स्पष्ट केले आहे.