वीज वितरण कंपन्यांचा सर्वसामान्यांना विजेचा शॉक !

0

लोकशाही संपादकीय लेख 

स्वयंपाकाचा गॅस प्रति सिलेंडर ५० रुपयाने वाढल्यानंतर १ एप्रिल पासून महावितरण तर्फे वितरित होणारी वीज स्वस्त होईल असे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले होते. तथापि एक एप्रिल पासून विजेचे दर स्वस्त तर झाले नाहीच उलट ६० पैसे प्रति युनिट विजेच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना विजेचा मोठा शॉक बसला आहे. केंद्र सरकारने घरगुती स्वयंपाक गॅस सिलेंडरच्या दरात केलेल्या ५० रुपयांच्या वाढीनंतर राज्य सरकारने विजेच्या दरात प्रति युनिट ६० पैसे वाढ करून सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. त्याचबरोबर गेल्यात आठ दिवसापासून तापमानात कमालीची वाढ झाली असताना जळगाव जिल्ह्यात दिवसभर विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. नुकतेच भुसावळचे तापमान ४५.५ डिग्री पर्यंत गेले होते.

राज्यात सर्वाधिक तापमानाची ही नोंद झाली. जळगाव जिल्ह्यात सरासरी ४५ अंश डिग्री तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले असताना विजेचा अघोषित लपंडाव सुरू झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. सर्वसामान्यांच्या घरातील कुलरची हवा सुद्धा गरम येत असल्याने नागरिक त्रासले आहे. त्यातच राज्य शासनाने विजेच्या दरात वाढ करून सर्वसामान्यांच्या पेकाटात जणू लाथ मारली आहे. त्यातच अघोषित शट डाऊन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई बरोबर जीवनासाठी आवश्यक असलेले गॅस आणि विजेच्या दरातही वाढ करून महाराष्ट्र सरकारने जणू महागाईच्या खाईत जनतेला लोटले आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. प्रचंड अशा बहुमताने महाराष्ट्रात युती सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु गेले चार महिने झाले महायुतीचे सरकार सत्तेवर आले, परंतु जनतेच्या हितासाठी गेल्या चार महिन्यात काहीही केले गेलेले नाही. उलट महागाई वाढली आहे. सर्वसामान्य जनतेने जनतेला जणू कोणी वालीच राहिलेला नाही. २८८ च्या विधानसभेत २३७ इतके प्रचंड बहुमत मिळाले असताना जनतेसाठी सरकार काही चांगले पाऊल टाकेल असे वाटले असताना सर्व निर्णय जनतेच्या विरोधात घेतले जात आहेत, हे दुर्दैवाने म्हणावे लागते. तीन पक्षाचे बनलेले महायुती सरकार आणि केंद्रातही महायुतीचे सरकार असताना डबल इंजिन सरकारमुळे जनतेचा फायदा होईल असे सांगणारे महायुती सरकार राज्यात एकमेकांच्या उकाड्या पाकळ्या काढण्यातच गर्क आहेत.

महावितरण कंपनीतर्फे १ एप्रिल पासून स्वस्त होणाऱ्या विजेला स्थगिती देण्यात आली असून त्याच दरम्यान महावितरण कंपनीने परिपत्रक काढून घरगुती ग्राहकांच्या विजेच्या दरात वाढ केली. म्हणजे सध्या राज्यात ‘हम करे सो कायदा’ हा प्रकार चालू आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मार्चच्या वापरावरच हे वाढीव खरेदीचे महागडे दर लागू होणार आहेत. वर्गवारीनुसार आता ग्राहकांना जे वाढीव दर मोजावे लागणार आहेत. त्यात व्यावसायिक ग्राहकांना ४० ते ६० पैसे प्रति युनिट जादा मोजावे लागणार आहेत. कृषीसाठी १५ ते ३० पैसे, पथदिव्यांसाठी ३० ते ३५ पैसे, पाणीपुरवठ्यासाठी ३० ते ३५ पैसे, ईव्ही चार्जिंग स्टेशनला ४० पैसे आणि उद्योगांना ३५ ते ४० पैसे प्रति युनिट जादा मोजावे लागणार आहेत. धगधगत्या तापमानात विजेच्या वाढत्या दराचा फटका आता ग्राहकांना बसणार आहे.

दरम्यान वाढत्या तापमानामुळे महाराष्ट्रात विजेची मागणी ३० हजार मेगावात पर्यंत पोहोचले आहे. त्यातच चंद्रपूर, खापरखेडा आणि भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील प्रत्येक एक युनिट बंद पडल्याने महावितरणला महागड्या दराने वीज खरेदी करावी लागत आहे. त्याचा भुर्दंड ग्राहकांवर बसतो आहे. त्यामुळे महागाईच्या विळख्यात महाराष्ट्राची जनता अडकतच चालली असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आता मुबलक विजेची निर्मिती होणार असल्याने शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण वेळ पुरवठा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असतानाच मुबलक वीज निर्माण तर झाली नाहीच उलट विजेच्या निर्मितीवर घट होत असल्याने विजेच्या दरात वाढ करावी लागत आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील जनतेला महागाईशी सामना करावा लागत आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर दरातील वाढीबरोबरच विजेच्या दरात वाढ करून महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.