महामार्गावर पोलिस असल्याची बतावणी ; तोतया पोलिसाविरुद्ध गुन्हा

0

महामार्गावर पोलिस असल्याची बतावणी ; तोतया पोलिसाविरुद्ध गुन्हा

जळगाव प्रतिनिधी

हातात पोलिसांची काठी घेऊन स्वतःला पोलिस असल्याचे भासवणाऱ्या दुचाकीस्वाराने महामार्गावर गोंधळ घालून एका वाहनचालकाला अश्लील शिवीगाळ केल्याची घटना १४ मार्च रोजी संध्याकाळी घडली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जयेश खुमानसिंग ठाकूर (वय ४३, रा. व्यंकटेश कॉलनी) हे कारने महामार्गावर प्रवास करत असताना ट्रॅफिकमुळे थांबले होते. त्याच वेळी, एका दुचाकीस्वाराने (क्र. एमएच १९, सीके ५७४७) त्यांच्यासमोर गाडी थांबवली. दुचाकीवरील व्यक्तीने हातात पोलिसांची काठी घेतली होती आणि पोलिस असल्याचे भासवत ठाकूर यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, त्याने कारचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारामुळे ठाकूर यांनी कारमधून उतरून त्या दुचाकीस्वाराला प्रश्न विचारला. त्यांनी आपली ओळख भाजप पदाधिकारी म्हणून दिली आणि फोटो का काढला, याबाबत विचारणा केली. मात्र, दुचाकीस्वार कोणतेही उत्तर न देता निघून गेला.

ठाकूर यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दुचाकी क्रमांकाच्या आधारे दुचाकीस्वाराचे नाव मनोहर बाविस्कर (रा. खोटेनगर) असल्याचे निष्पन्न केले. हा व्यक्ती स्वतःला पोलिस असल्याचे भासवून वाहनचालकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी पूर्वीपासूनच आहेत. मात्र, यापूर्वी कोणीही पोलीस तक्रार दिली नव्हती. ठाकूर यांच्यासोबत असा प्रकार घडल्याने त्यांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.