मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात थंडीचा जोर गेल्या काही दिवसांपासून वाढला असून नागरीकांना हुडहुडी भरली आहे. राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये थंडी आणखी वाढणार असून किमान तापमानमध्ये दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
नाशिकमध्ये ही थंडीच्या कडक्यात मोठी वाढ झाली आहे. किमान तापमान 11 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलं आहे. नाशिकमध्ये सकाळच्या वेळी धुकं राहणार असून त्यानंतर आकाश निरभ्र असणार आहे. तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस असेल. तर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये ढगाळ आकाशाह धुकं पाहायला मिळणार आहे. तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तापमान 13 अंश सेल्सियस एवढं असणार आहे.
तर मराठवाड्यात पुढील काही दिवसांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही थंडीचा कडाका वाढल्याचे पाहायला मिळतंय. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी धुकं असणार आहे. त्यानंतर मात्र आकाश निरभ्र होईल. मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढं राहील. पुणे शहरांमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून कमाल आणि किमान तापमानात दोन अंशांनी घट झाल्याचे पाहायला मिळतंय. पुण्यामध्ये निरभ्र आकाश राहून कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
पुढील 24 तासांत छत्रपती संभाजीनगरमध्ये निरभ्र आकाश राहणार आहे तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे.