लोकशाही संपादकीय लेख
महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार आले आहे. महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांना या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. शिवसेना (उबाठा), काँग्रेस यांचीही गत पाहण्यासारखी झाली. महाराष्ट्रातील मतदारांनी महायुतीच्या पारड्यात मोठे दान टाकत पुन्हा महायुतीच असा संदेश दिला आहे. शरद पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र जनतेने त्यांना साफ नाकारत जो काही संदेश दिला आहे तो महाविकास आघाडीसाठी धोक्याचाच आहे. मराठा समाज सोबत असल्याचे सुरुवातीला शरद पवारांनी भासविले मात्र ते निकातून काहीही सिद्ध झालेले नाही.
महायुतीकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मी पुन्हा उपोषणाला बसेल असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला. मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यावर भाष्य करताना गोपीचंद पडळकर म्हणाले होते की, ‘देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने सगळे बोंबलून दमलेले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीला काय निकाल दिला हे सगळ्यांनी पाहिलेले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व जपावे असे सर्वांना वाटले. तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी जपले त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठे बहुमत भाजपसह महायुतीला मिळाले. शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनवरच शंका उपस्थित करुन संभ्रमाचे वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. उबाठाचे नेते संजय राऊत तर पहिल्या दिवसापासून ईव्हीएमच्या नावाने बोट मोडत आहेत.
मात्र न्यायालयाने या सर्वांची चांगलीच कान उघाडणी करीत ‘विजय मिळाला तर चांगले अन् पराभव झाला तर घोटाळा’ असे कसे असा सवाल करीत महाविकासला फटकारले आहे. श्री. पवार असेही सांगतात की, ईव्हीएमवर संशय येऊ नये म्हणून छोटी राज्य भाजप हरली आणि विरोधकांना तेथे जिंकून आणले आणि भाजपने मोठी राज्य स्वत:कडे ठेवली. मुळात शरद पवारांनी विधानसभेच्या अगोदरच सेवानिवृत्ती घ्यायला हवी होती. लोकांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून संपला आहे, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकरांनी करीत त्यांच्यावर हल्लाबोल केला असला तरी राज्यातील राजकारणात कोण कधी ‘कानामागून येईल अन् तिखट होईल’ हे सांगता येत नाही हेच खरे.
महाविकास आघाडीने प्रचारात महायुतीवर खालच्या पातळीवर जावून जी टीका केली ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभली नाही, जनतेला रुतली देखील नाही. महायुतीच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान विकास, लाडकी बहिण, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांचे प्रश्न गांभिर्याने मांडून ते केंद्र सरकारच्या मदतीने कसे दूर करता येईल हे प्रभावीपणे मांडल्याने जनतेच्या मनात घर करुन महायुतीने यशाच्या गगन स्पर्श केला. जनतेला आता ‘विकासा’ची आस लागून असतांना महाविकास आघाडीकडून जाणूनबुजून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र महायुतीचे नेते विरोधकांकडे दुर्लक्ष करीत सरकार स्थापनेचा मुहूर्त गवसत आहेत. शरद पवार हे राजकारणातील मोठी व्यक्ती असल्याने त्यांच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे, मात्र ते ज्या पद्धतीने राजकारणाचा डाव मांडत आहेत. तो जनतेला पचणी पडत नाही. एकंदरीत काय तर पवार साहेबांची गत म्हणजे ‘मज फूलही रुतावे’ अशीच झाली आहे.