विधानसभेसाठी बुधवारी राज्यात एकाच टप्प्यात मतदान !
निवडणूक आयोगाकडून तयारी पूर्ण : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलही सज्ज आहे. नागरिकांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. सर्व राजकीय पक्षांचे देशातील प्रमुख नेते, राज्यातील वरिष्ठ नेते आणि इतर स्टार प्रचारकांच्या सभा, रोड-शो यामुळे गेल्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, टीका-टिप्पणी आणि सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांसह जातीय-धार्मिक अशा विविध मुद्द्यांभोवती निवडणुकीचा प्रचार फिरत राहिला. शिवसेना व राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच सहा पक्ष व अपक्षांच्या गलबलात ही निवडणूक पार पडत आहे. सत्ताधारी महायुती व महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढत होत असून अनेक ठिकाणी बंडखोरांमुळे पक्षीय उमेदवारांचे टेंशन वाढले आहे. शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार असून त्याकडेही संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. लोकसभेत ‘बारामती कोणाची’ हा सामना नणंद- भावजयीत रंगला होता, तर या नाट्याचा पुढचा अंक विधानसभेत काका-पुतण्या यांच्यात रंगतो आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर रांगा लागल्याचा अनुभव पाहता, विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. मतदान केंद्रात एका वेळी चार जणांना प्रवेश दिला जाईल. तेथे तीन अधिकारी उपस्थित असल्याने प्रत्येक अधिकाऱ्याकडे एकेक मतदार जाईल. तेथे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चौथा मतदार थेट मतदान करू शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेला विलंब होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. मतदार ओळखपत्र दाखवून ओळख पटवून देणे, स्वाक्षरी करणे, बोटांना शाई लावणे त्यानंतर थेट मतदान अशा चार टप्प्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्याकरिता तीन टप्प्यांवर अधिकारी उपस्थित असणार आहेत.
दिव्यांग मतदारांसाठी सुविधा
दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्ह्यात तीन हजार 991 व्हीलचेअर्स, आठ हजार 462 मॅग्निफाइंग ग्लास तसेच मदतीसाठी सहा हजार 104 स्वंयसेवक उपलब्ध करून देणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर रॅम्पची सुविधा, तळमजल्यावर मतदान केंद्र, स्वतंत्र रांग, दिशादर्शक फलक, प्रतीक्षालय, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहनतळ, प्रथमोपचार पेटी, मदत कक्ष, ब्रेल लिपीतील साहित्य, कर्णबधिर दिव्यांगांसाठी दुभाषक, 9226363002 हा हेल्पलाइन क्रमांक आदी सुविधा देण्यात येणार आहेत.
40 कोटींचा मुद्देमाल जप्त
गेल्या एक महिन्यादरम्यान स्थिर तसेच ‘भरारी पथका’ मार्फत सुमारे 40 कोटी 18 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यापैकी 12 कोटी 11 लाख रुपयांची रोकडचा समावेश आहे. नऊ कोटी 63 लाख रुपयांचे मद्य, 62 लाखांचे अमली पदार्थ, तसेच साहित्यांसह 40 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.