मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशासह राज्यात देखील पावसाने चांगलाच जोर धरला आहे. तर अनेक भागांत पूरस्थिती उद्भवल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्रात पुरामुळे सुमारे 128 गावांचा संपर्क तुटला आहे. तर राजस्थानातील अनेक जिल्ह्यांत 186% हून अधिक पाऊस झाला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, शनिवारी तेलंगण, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग तथा गुजरातच्या काही भागांत मुसळधार पाऊस झाला. उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश, ओडिशा, गोवा, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, केरळ व कर्नाटकात मुसळधार पाऊस झाला.
हवामान विभागाकडून राज्यात १३ जुलैपर्यंत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज हवामान खात्याने पुणे जिल्ह्यात 11 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. तर आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट ?
उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर १३ जुलैला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्यात पाऊस पडणार, असे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले.
दरम्यान महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे 128 गावांचा संपर्क तुटला आहे. तर मराठवाड्यातील हिंगोली व नांदेडसह दुर्गम गडचिरोली जिल्ह्यालाही पावासाचा मोठा फटका बसला आहे.