खुशखबर.. राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार

तब्बल साडेसात हजार पदे भरणार

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

 

पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती केली जाणार आहे. पोलीस दलातील तब्बल साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यापैकी तब्बल बाराशे पदं मुंबई पोलीस दलासाठी भरली जाणार आहेत.

काही दिवसांपूर्वी राज्यात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी लवकरात लवकर सध्याची 14 हजार 471 पदांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागानं सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते. आतापर्यंत 25 जिल्ह्यांत पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक, शिपाई आणि पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनच्या लेखी परीक्षा घेण्यात आल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदान न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशीरानं घेण्यात आलेली. सध्याची पोलीस भरती प्रक्रिया संपल्यानंतर राज्यात नवी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

डिसेंबरमध्ये राबवण्यात येणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुंबईत गेल्या वर्षी आठ हजार पदांची भरती झाली होती. त्यातील बहुतांश पोलीस त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून सप्टेंबरमध्ये पोलीस दलात दाखल होणार आहेत. मुंबईत 4230 पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पोलिसांकडे 5 लाख 69 हजार अर्ज आले आहेत. त्यापैकी दोन हजार 572 पोलीस हवालदार, 917 चालक, 717 तुरुंग हवालदार आणि 24 बँड्समन पदांसाठी अर्ज करण्यात आलेत.

राज्यात महिला पोलीस भरतीसाठी यावेळी 3924 पदांसाठी पावणेतीन लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी एक लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्चशिक्षित आहेत. मुंबईला सर्वाधिक पसंती असून एक लाखांहून अधिक महिलांनी मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज केले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.