मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्रिपदाबाबत अस्पष्टता असली तरी महायुतीच्या दि. 5 डिसेंबरच्या शपथविधीसाठी लगबग सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या सरकारी बंगल्यावर भाजप नेत्यांची रीघ लागली होती. दुसरीकडे, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार पंकजा मुंडे आदींनी सोमवारी ‘सागर’ बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादी (शप) पक्षाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनीही ‘सागर’वर जाऊन फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व संकटमोचक मानले जाणारे भाजप नेते गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले. ‘एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो. महायुतीत सर्वकाही आलबेल आहे, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे महाजन यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. शपथविधीला आम्ही एकत्रित दिसू, असेही महाजन म्हणाले. दरम्यान, शिंदे यांच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने सोमवारच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. त्यांच्या भेटीसाठी शिवसेना नेत्यांची रिघ लागली होती.