बळीराजाला सक्षम करण्याचा संकल्प करुया..

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या संपूर्ण देशाचं ओझं बळीराजाच्या खांद्यावर आहे. देशासह महाराष्ट्रात देखील शेती हा प्रमुख व्यवसाय केला जातो. आपला देश विकासाच्या प्रगतीपथावर आहे. आजच्या आधुनिक युगात विज्ञान आणि संशोधनाची कास धरत शेतकरी देखील पारंपारिक पद्धतीसह अनेक आधुनिक बदल स्वीकारत आहे. आपल्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. म्हणून आपला पोशिंदा जगणं गरजेचं आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी आपले अमूल्य योगदान दिले आहे. म्हणून वसंतराव नाईक यांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक म्हटले जाते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त १ जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

पारंपारिक शेतीमुळे शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळत नव्हते, म्हणून शेतीला आधुनिक स्वरूप प्राप्त करून शेतीवर विविध संशोधन होण्यासाठी वसंतराव नाईक यांनी राज्यात कृषी विद्यापीठं स्थापन केली.

वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या हाताळल्या होत्या. यात त्यांनी आपले मुख्य लक्ष महाराष्ट्रातल्या धान्याच्या समस्या सोडविण्याकडे दिले होते. महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण व्हावा यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले होते. तसेच वेळप्रसंगी त्यांनी महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण न झाल्यास मी फाशी घेईल असे देखील स्पष्टपणे ठामपणे सांगितले होते. यावरून त्यांच्या मनात शेती आणि शेतकरी या दोघांविषयी किती कळकळ होती, हे दिसून येते.

तेव्हा हरित क्रांती घडवून आणत असताना फार मुबलक साधने उपलब्ध होती. परिस्थिती देखील खुप प्रतिकुल होती. तरीही वसंतराव नाईक यांनी शेती क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली होती.

आज कृषी क्षेत्राचा विस्तार वाढतांना दिसत आहे. आजची युवा पिढी शेतीकडे वळताना दिसत आहे. अनेकदा बळीराजाला निसर्गाची साथ मिळत नाही, तरीही बळीराजा अगदी जोमाने या नैसर्गिक संकटाचा सामना करताना दिसतो. तसेच सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. मात्र अनेक शेतकरी या योजनांपासून वंचित राहतात. यासाठी आपण जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करायला पाहिजे. चला तर मग यंदाच्या कृषी दिनी बळीराजाला सक्षम करण्याचा संकल्प करुया..

 

Leave A Reply

Your email address will not be published.