जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात सर्वदूर कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअसहून अधिक नोंदवले जात आहे. यामध्ये कोकण विभागात सरासरीहून कमाल तापमान मोठ्या फरकाने चढे असून दमट आणि उष्ण हवामानामुळे या विभागातील नागरिक अधिक त्रस्त आहेत. मुंबईमध्ये मंगळवार व बुधवारी उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिक हैराण होते. या आठवड्याच्या अखेरपर्यंत कमाल तापमानाचा पारा 37 ते 38 अंशांपर्यंत जाईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. जळगाव जिल्ह्यातही उष्णतेची दाहकता जाणवत असूपन आगामी काळात लाट येण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात मुंबईमध्ये कमाल तापमानाचा पारा चढा राहील, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने नोंदवला आहे. बुधवार आणि गुरुवारी आभाळ ढगाळलेले असेल. त्यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा अस्वस्थता अधिक जाणवण्याचीही शक्यता आहे. केवळ मुंबईतच नाही तर दक्षिण कोकणातही तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज आहे. राज्यात आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. वाऱ्यांची दिशाही बदलत असून अरबी समुद्रामध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य भारतात कमाल तापमानाचा पारा अधिक वाढू शकतो. महाराष्ट्रावरही याचा परिणाम अपेक्षित आहे. ही तापमान वाढ 13 मार्चपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून या काळात तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस असू शकेल, अशी माहिती आहे. या चढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पाणी पिणे, उन्हापासून संरक्षण या गोष्टींचा अवलंब करायचे आवाहनही हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे.
नागरिकांनी दक्ष रहावे !
जळगावसह राज्यभरात उष्णतेची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेने नागरिक हैराण झालेले आहेत. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लाट येण्याची शक्यता असून नागरिकांनी दक्ष रहावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

