मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा फैसला झाला आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महायुती (भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्टवादी (अजित पवार) मध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिपदावरून खलबते सुरू असताना जनतेला प्रतीक्षा आज अखेरीस संपली आहे. या दरम्यान, राजकारण्यांचा पगार जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळतो विशेषतः आपल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांचा पगार किती आहे? महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तवली जात असताना आज अखेरीस जनतेची प्रतीक्षा संपुष्टात आली आणि देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पगारात वेळोवेळी सुधारणा केली जाते आणि प्रत्येक राज्याच्या मंत्र्यांची वेतनश्रेणी वेगळी असते. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशा मोठ्या पदांपेक्षा राज्यातील मुख्यमंत्र्यांचे पगार जास्त असून इतर सुविधाही उपलब्धही मिळतात तर आमदाराचे वेतन राज्य सरकार ठरवते. याशिवाय मुख्यमंत्र्यांप्रमाणेच आमदारांनाही अनेक भत्ते आणि सुविधाही मिळतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा 3.4 लाख रुपये पगार मिळतो आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत.
महाराष्ट्र मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते अधिनियम, 1956 नुसार, मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील मंत्र्यांना महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना मान्य असलेल्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या समतुल्य आणि वेळोवेळी सुधारित केल्यानुसार दिले जाईल. तसेच प्रत्येक मंत्री (यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा समावेश आहे) आणि राज्यमंत्र्यांना भाडे न भरता, मुंबईतील सुसज्ज निवासस्थानाचा वापर कार्यालयाच्या कार्यकाळात आणि त्यानंतर लगेचच पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी करता येईल.
आमदारांना दरमहा ठराविक पगार मिळतो, जो राज्य सरकार ठरवते मात्र आमदारांचा पगार राज्यांवर वेगवेगळा असतो. याशिवाय आमदारांना निवास, प्रवास भत्ता, दैनंदिन भत्ता, वाहतूक भत्ता, वैद्यकीय सुविधा आणि अगदी खाजगी सचिवाची सुविधा असे विविध भत्ते आणि सुविधाही मिळतात. तसेच प्रत्येक आमदाराला आपापल्या मतदारसंघातील लोककल्याणकारी कामांसाठी स्वतंत्र निधीही मिळतो, जो समाजसेवेसाठी खर्च करण्याचे त्यांना स्वतंत्र दिले जाते. महाराष्ट्रातील आमदारांना महिन्याला 2.32 लाख रुपये पगार मिळतो.
त्रिपुरात सर्वात कमी वेतन
तेलंगणातील आमदारांना भारतात सर्वाधिक पगार मिळतो. तेलंगणा राज्यात, पगार आणि भत्त्यांसह आमदारांचे एकूण वेतन 2.50 लाख रुपये प्रति महिना असून त्यांचे मूळ वेतन केवळ 20,000 रुपये आहे पण त्यांना 2,30,000 रुपयांपर्यंत भत्ते मिळतात. त्याचवेळी, त्रिपुराच्या आमदारांना सर्वात कमी वेतन मिळते, जे केवळ 34,000 रुपये प्रति महिना आहे.