महाराष्ट्र अंनिसने विवेकी विचारांची ज्योत तेवत ठेवली आहे

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

केवळ ज्ञान आणि माहिती मिळाली म्हणून संघटना कृतिशील होत नाही. त्यासाठी विचारांनी प्रेरित होऊन, स्वयंप्रेरणेने कृतीशील असणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी आवश्यक असते. आज समितीकडे तरुणांची टीम असल्याने संघटना मजबूतपणे उभी आहे. विवेकी विचारांची ज्योत तेवत ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र अंनिसने यशस्वीपणे पार पाडली आहे  व पुढेही सुरू राहणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे (शहादा) यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे भुसावळ शाखेच्या सहकार्याने कार्यकर्ता प्रशिक्षण संवाद शिबीर शहरात प.क.कोटेचा महाविद्यालय येथे घेण्यात आले. सकाळी शिबिराचे उद्घाटन भुसावळ शाखेचे शहराध्यक्ष शांताराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जाधव म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार समाजामध्ये कायम रुजला व टिकला पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांसह समाजातील प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.  परिवर्तनाच्या विचारामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असतात, असेही जाधव यांनी सांगितले.

यावेळी प्रस्तावनामध्ये शिबिर घेण्यामागचा उद्देश जिल्हा पदाधिकारी अरुण दामोदर यांनी स्पष्ट केला.  सूत्रसंचालन प्रा.निलेश गुरुचळ व आभार शाखा कार्याध्यक्ष सागर बहिरुणे यांनी केले. यावेळी जिल्हा प्रधान सचिव अशोक तायडे व मोहन मेढे यांचेसह जळगाव, यावल, किनगाव, वरणगाव, मुक्ताईनगर,  जामनेर, भुसावळ, बोदवड, मालखेडा, रावेर या शाखांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शिबिर यशस्वीतेसाठी डॉ.रुपेश मोरे, प्रभाकर पाटील, मुरलीधर सोनवणे, अंजना निरभवणे आदींनी परिश्रम घेतले.

 अंनिसने समाज शोषणमुक्त करण्याचे काम केले

शिबिरात पहिल्या सत्रामध्ये “संघटना बांधणी” याविषयी राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी संघटना कशी चालते याविषयी विस्तृत माहिती दिली. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आता विवेकवादापर्यंत येऊन ठेवले आहे. समाज नास्तिक करणे हे समितीचे गेल्या ३३ वर्षात कधीच ध्येय नव्हते. त्याबाबत सातत्याने गैरसमज पसरवण्यात आला आहे. विवेकपूर्ण व्यवहार करणारा समाज निर्माण करणे हे व्यापक स्वरूपाचे ध्येय समितीचे कायम राहिले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अंनिस लोकशाही बळकट करण्याचे काम करते. संघटना, कार्यकर्ता, पैसा, वेळ, विचार, त्याग आणि नेतृत्व या जोरावर चालते. कोणतीही संघटना ही ध्येयवादी माणसे चालवू शकतात. त्यासाठी कार्यकर्ते स्वतः राबतात. ध्येयवादाने प्रेरित होऊन सातत्याने क्रियाशील असलेल्या कार्यकर्त्यांच्या बळावर संघटना चालते, अशी माहिती विनायक सावळे यांनी दिली.

शिबिरातील दुसऱ्या सत्रामध्ये ‘जादूटोणाविरोधी कायदा’ आणि ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा’ याविषयी जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, प्रचंड १८ वर्षांच्या संघर्षातून तसेच डॉ. दाभोलकर यांच्या बलिदाननंतर जादूटोणाविरोधी कायदा पारित करण्यात समितीला यश मिळाले. या कायद्यामुळे नरबळी देणं, दैवी शक्ती व गुप्तधनाच्या नावाखाली कोणी फसवणूक करत असेल तर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत त्याच्यावर थेट गुन्हा दाखल होतो. त्यासाठी आता कायदा मजबूत झाल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

त्याचबरोबर अनेक जात व्यवस्थांनी त्यांच्या पंचायती बसवून समाजातील नागरिकांचे शोषण करणे, त्यांना वाळीत टाकणे, त्यांच्यावर बहिष्कार घालणे, त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न करून घेणे अशा गोष्टी केल्या तर त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार विरोधी कायदेअंतर्गत गुन्हा दाखल करता येतो. याबाबतही २०१६ साली कायदा पारित झाला आहे. त्यामुळे समितीने हे दोन कायदे राज्य सरकारकडून पारित केल्याने महाराष्ट्रातील शोषित होत असलेल्या जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नागरिक आता थेट गुन्हे दाखल करू शकतात. त्यांना कायद्याचं संरक्षण मिळाले, अशी माहितीही यावेळी विश्वजीत चौधरी यांनी दिली.

समिती पंचसूत्रावर चालणारी 

तिसऱ्या सत्रात विनायक सावळे यांनी ‘समितीची पंचसूत्री’ याविषयी माहिती दिली. शोषण करणाऱ्या, फसवणूक व दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार व अंगीकार करणे, धर्माची विधायक व कालसुसंगत  चिकित्सा करणे, संत व समाजसुधारकांचा वारसा आणि संविधानाचा मूल्य आशय कृतीशील करणे, व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेणे अशी पंचसूत्री असल्याची माहिती विनायक सावळे यांनी यावेळी दिली. तसेच संघटनेत कसे सहभागी व्हावे, शाखांची रचना कशी असते याबाबत देखील त्यांनी या सत्रात सविस्तर माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.