अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; आतापर्यंत ८ हजार कोटींचे वितरण

0

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; आतापर्यंत ८ हजार कोटींचे वितरण

आणखी ११ हजार कोटींच्या मदतीस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

मुंबई प्रतिनिधी राज्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या पिकांच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदत पॅकेजअंतर्गत आतापर्यंत तब्बल आठ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. तसेच, आणखी अकरा हजार कोटी रुपये मंजूर करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली असून, ही रक्कम पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजचा आढावा घेण्यात आला. यापैकी ८ हजार कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले असून, उर्वरित ११ हजार कोटी रुपयांचे वितरण करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. हे पैसे अंदाजपत्रकात नसल्याने विशेष तरतूद करून मंजूर करण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सरकारकडून योग्य पात्र शेतकऱ्यांनाच मदत मिळावी आणि अपात्रांना ती न मिळावी, यासाठी काटेकोर पडताळणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. “मोठ्या प्रमाणात फेरपडताळणी सुरू आहे. पुढील १५ ते २० दिवसांत बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा केली जाईल. सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांना या कालावधीत मदत मिळेल,” असे फडणवीस यांनी नमूद केले.

राज्यातील सुमारे ४० लाख शेतकऱ्यांना या मदत योजनेचा लाभ मिळणार असून, एकूण ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी जवळपास २१ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे (Direct Benefit Transfer) जमा करण्यात येणार आहेत. “निधीची कोणतीही कमतरता नाही; शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रत्येक रुपया योग्य ठिकाणी पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,” असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

या निर्णयामुळे अतिवृष्टीने कर्जबाजारी झालेल्या आणि पिके गमावलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, राज्यभरातील कृषी क्षेत्रात या घोषणेचे स्वागत केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.