महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेची एकनाथराव खडसे यांच्याशी भेट; ऑनलाइन फेस रीडिंग हजेरी स्थगितीचे आश्वासन
महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेची एकनाथराव खडसे यांच्याशी भेट; ऑनलाइन फेस रीडिंग हजेरी स्थगितीचे आश्वासन
जळगाव, ;- आज महाराष्ट्र राज्य कस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, आरोग्य कर्मचारी संघटना आणि बहुविध आरोग्य कर्मचारी संघटना ११७३ यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर, बोदवड, यावल आणि रावेर तालुक्यांतील आरोग्य कर्मचाऱ्यांसह माजी मंत्री आणि विद्यमान आमदार एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. या भेटीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन फेस रीडिंग हजेरी आणि वेतन त्रुटींमुळे होणाऱ्या अडचणींबाबत निवेदन सादर करून सविस्तर चर्चा केली.
आ. खडसे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा गांभीर्याने विचार करत तात्काळ राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त आणि अभियान संचालक अमगोथू श्रीरंगा नायक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. ऑनलाइन फेस रीडिंग हजेरीमुळे कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती दिल्यानंतर आयुक्त नायक यांनी ही हजेरी प्रणाली स्थगित करण्याचे आश्वासन दिले. तसेच, या प्रणालीमुळे कोणत्याही कर्मचाऱ्याच्या वेतनावर परिणाम होणार नाही किंवा पगार थांबणार नाही, असेही स्पष्ट केले.या निर्णयामुळे राज्यातील सर्व आरोग्य कर्मचारी संघटनांनी खडसे आणि आयुक्त नायक यांचे आभार मानले आहेत.