लोकशाही संपादकीय लेख
महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे. दुपारपर्यंत अत्यंत कमी मतदान झाले.. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. एकूण राज्यात ६२ टक्के तर जळगाव जिल्ह्यात एकूण ६५ टक्के मतदान झाले. मतदान ईव्हीएम मध्ये कैद झाल्यावर विविध संस्थांचे एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले. त्यातील एकूण ६५ टक्के एक्झिट पोलचे निकाल सांगतात की, महायुती सत्तेवर येणार आहे. तर महाविकास आघाडी सत्तेच्या काठावर राहणार आहे. बाकी ३५ टक्के एक्झिट पोलचे निकाल सांगतात की, महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे. शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. त्यानंतर संपूर्ण निकाल जाहीर होतील. या निकालानंतर एक्झिट पोलच्या निकालाचा पर्दाफाश होईल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक्झिट पोलच्या निकालाची पोलखोल झाली होती.
एक्झिट पोलचे निकाल पूर्णतः उघडे पडल्याचे दिसून आले. त्यानंतर हरियाणा विधानसभा निवडणुकीत जवळजवळ सर्वच एक्झिट पोलचे निकाल खोटे ठरले. बहुतेकांनी काँग्रेसची सत्ता येईल, असा अंदाज वर्तविला होता. परंतु त्यांच्या अगदी उलटे झाले. आणि हरियाणात महायुतीची सत्ता आली. त्यामुळे एक्झिट पोलचे निकाल पूर्णतः खोटे ठरले. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काट्याची टक्कर प्रत्येक मतदारसंघात पाहायला मिळाली. यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराचे वैशिष्ट्य म्हणजे शेवटच्या चार दिवसांचा प्रचार बाकी असताना केंद्रातील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या सभा न घेता ते दिल्लीला परत गेले होते. त्यामुळे केंद्रीय नेत्यांशिवाय महायुतीचा प्रचार झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा का रद्द झाल्या? हे अद्याप कळू शकले नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या नेत्यांनी निवडणूक प्रचार जाहीर सभांनी पिंजून काढला. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जाहीर सभांना होणारी गर्दी लक्षवेधी होती. महायुतीच्या स्थानिक नेत्यांच्या जाहीर सभांना होणारी गर्दी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जाहीर सभांना झालेली गर्दी यांची तुलना केली तर महायुतीच्या सभांची गर्दी कमी होती, हे सत्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सभांना होणाऱ्या गर्दीचे मतदानात कसे रूपांतर होईल? हे २३ तारखेच्या निकालातून दिसणार आहे.
आता मतमोजणीतून प्रत्यक्ष निकालाची प्रतीक्षा आहे. दिनांक २३ रोजी मतमोजणीतून प्रत्येक निकाल कळणार आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी जो मतदानाचा टक्का वाढला आहे. त्या वाढलेल्या टक्केवारीमुळे उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. कारण १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत ७१ टक्के मतदान झाले. होते त्यानंतर ३० वर्षानंतर म्हणजे २०२४ मध्ये महाराष्ट्रात एकूण ६२.०५ % मतदान झाले आहे, हे विशेष होय.. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ५७ % इतके मतदान झाले होते. त्यामुळे महाराष्ट्रात यंदा वाढलेल्या ०५ टक्के मतदानाचा फायदा नेमका होणार कुणाला? हा खरा प्रश्न आहे. सत्ताधारी महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे की, त्याचा फायदा महायुतीला होणार असून महायुती सत्तेत बसणार आहे. तर महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की, वाढलेल्या टक्केवारीचा फायदा विरोधी पक्षांना होणार आहे.
वाढलेले मतदान सत्तेच्या विरोधात होते, असा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दावा आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांचा फायदा कुणाला होईल? हे मतमोजणीतूनच स्पष्ट होईल. असे असले तरी दलित आणि आदिवासी समाजाची मतदानाची टक्केवारी वाढलेली असल्याचे दिसून येते. त्यामुळे वाढलेल्या दलित आदिवासींनी कुणाला मतदान केले? हे आता मतमोजणीतूनच स्पष्ट होईल. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदानाची टक्केवारी वाढेल, ही अपेक्षा होती. तथापि लाडकी बहीण योजनेचा विशेष फायदा झाला नसल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे वाढीव ०५ % मतदानाने कुणाचे टेन्शन वाढले आहे? अथवा कुणाचे टेन्शन कमी झाले आहे? हे मतमोजणीतूनच स्पष्ट होईल. त्यामुळे एक्झिट पोलचे निकाल आणि वाढीव मतदानाची टक्केवारी या दोन बाबी निकालातून स्पष्ट होणार आहेत. जळगाव जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण जळगाव जिल्ह्यात एकूण तीन कॅबिनेट मंत्र्यांचे भवितव्य ठरणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या भवितव्याचा फैसला येथे २३ तारखेलाच होणार आहे…!