आरोपांच्या फैरी…सभांचे फड अन्‌ बॅग तपासणीचे ‘राजकारण’ !

ठाकरेंच्या संतापानंतर शिंदे, फडणवीस, पवारांचा नंबर : कुणाकडे चकली, कुणाकडे सापडले कपडे अन्‌ लाडू

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राज्यभरात वातावरण तप्त झाले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून सर्वत्र नेत्यांच्या सभांचे फडही रंगत आहेत. शिवसेना (उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला होता. ठाकरेंच्या संतापानंतर आता निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचीही बॅग तपासली आहे. निवडणूक आयोगाच्या स्थिर पथकाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या बड्या राजकीय नेत्यांच्या बॅगा तपासणीचे काम सुरू आहे. निवडणूक आयोगाचे कर्मचारी थेट हेलिपॅडवरच बॅगा तपासतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमधील वणी मतदारसंघात आणि लातूरच्या औसा मतदारसंघातील सभेसाठी जात असताना त्यांच्या बॅगा तपासण्याचा व्हिडिओ त्यांनी स्वत: शूट केला होता.

अशातच ज्याप्रमाणे माझ्या बॅगा तपासल्या तशाच मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅगा तपासा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या बॅगा तपासल्याचा व्हिडिओसुद्धा मला पाठवा, असेही त्यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या या व्हायरल व्हिडिओनंतर आता पालघर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही बॅगांची झडती घेण्यात आली आहे. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना चांगलाच टोला लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ पालघरमध्ये जाहीर सभा घेण्यात आली. या सभेपूर्वी पालघर येथील पोलीस मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हॅलिकॉप्टर येताच, निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी झाडाझडती घेणाऱ्या अधिकाऱ्यांना उद्देशून उद्धव ठाकरेंवर निशाणा लगावला. ह्या बॅगेत काहीही नाही, बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला. तसेच इलेक्शन कमिशन त्यांचे काम करत आहे. त्यांच्यावर राग कशाला काढता, लाडक्या बहीण योजनेमुळे हे बिथरून गेले आहेत, त्यामुळे ते कोणावरही आरोप करत सुटल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.

उद्धव ठाकरेंची बॅग तपासणी

दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभा घेतेवेळी निवडणूक कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या, त्यावरुन त्यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच, नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोलाही लगावला होता. बॅगच काय तपासताय युरीन पॉट पण तपासा, असे म्हणत वणी येथील निवडणूक कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ उद्धव ठाकरेंनी शूट केला होता. त्यावरुनच, आता मुख्यमंत्र्यांनी उलटा पलटवार केला आहे. ह्या बॅगेत काहीही नाही, बॅगेत कपडे आहेत, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.

अजित पवारांच्या बॅगेत सापडले चकली, लाडू

आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बारामतीत अजित पवारांच्या हॅलिकॉफ्टरची तापासणी केली. अजित पवारांसोबत असणाऱ्या त्यांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या. फोनवर बोलत असताना अजित पवारांनी स्वत: बॅगा तपासण्यासाठी दिल्या. यावेळी एका बॅगेत चकल्या होत्या. बॅगेत चकल्या हातात घेऊन खा-खा बाबांनो सगळ्या बॅगा तपासात्या डब्यात पैसे आहेत का चेक कर असे अजित पवार अधिकाऱ्यांना बोलताना दिसले.

 

देवेंद्र फडणवीसांच्या बॅगचीही तपासणी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची देखील तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हिडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली असे म्हणत भाजप पक्षाकडून ठाकरेंवर टीका केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगचीही तपासणी झाल्याचा व्हिडीओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. कोल्हापूर विमानतळावर दि. 5 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती. यावेळीचा व्हिडीओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.