‘अभय शास्ती’ योजनेतुन जळगावकरांचा ३० कोटींचा भरणा

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरणाऱ्यांसाठी ‘अभय शास्ती’ योजना जाहीर करून संपूर्ण शास्ती (दंड) माफ केली आहे. या अंतर्गत तब्बल ३० कोटी रुपयांचा थकबाकीचा भरणा जळगावकरांनी केला आहे.

या योजनेचा शेवटचा दिवस आहे. जळगाव शहर महापालिकेची शहरातील मालमत्ताधारकांकडे १८० कोटींहून अधिक थकबाकी आहे. अनेक मालमत्ताधारकांनी गेल्या काही वर्षांपासून मालमत्ता कर व पाणीपट्टीचा भरणा केलेला नाही. या वर्षाची थकबाकी तब्बल ५० कोटींपेक्षा अधिक आहे.

थकबाकीचा भरणा वाढवा, यासाठी महापालिका प्रशासनाने थकबाकी भरणाऱ्यांना व्याज व दंडमाफीची ‘अभय शास्ती’ योजना लागू केली. महिनाभरापासून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. थकबाकी भरणाऱ्यांचा कल वाढला होता. त्यामुळे महापालिकेची ३० कोटी रुपये वसुली झाली. महापालिकेची आजपर्यंत एकूण ८५ कोटींपेक्षा अधिक वसुली झाली आहे.

महापालिकेच्या चारही प्रभाग समितीत मंगळवारी अभय योजनेंतर्गत दोन कोटी ५५ लाख रुपयांची मालमत्ताकरांची वसुली झाली. प्रभाग समिती क्रमांक एकमध्ये १ कोटी १३ लाख रुपये, प्रभाग समिती क्रमांक दोनमध्ये २९ लाख ५९ हजार, प्रभाग समिती क्रमांक तीनमध्ये ७८ लाख ८१ हजार, प्रभाग समिती क्र. ४ मध्ये ३३ लाख ३७ हजार रुपये जमा झाले.

या योजनेला आणखी मुदतवाढ मिळावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, मुदतवाढ मिळाली नाही, तर गुरुवार (ता. १६)पासून थकबाकीवर शास्ती लागू होणार आहे. महापालिकेकडून मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी शेवटच्या दिवशी नागरिकांनी आपली घरपट्टी भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन प्रशासनाने केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here