जळगाव महापालिका निवडणूक ; भाजपकडून मंगेश चव्हाण प्रभारी, सुरेश भोळे निवडणूक प्रमुख
जळगाव प्रतिनिधी येथील महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक बांधणीला गती देत महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव महापालिकेचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्याकडे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी यापूर्वी लोकसभा तसेच विविध नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पक्षाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. त्यांच्या अनुभवावर विश्वास ठेवत भाजप नेतृत्वाने जळगाव महापालिकेसाठीही त्यांच्यावरच निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शहर व जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाला नव्याने चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जळगाव शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुरेश भोळे यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत नियुक्तीपत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार, समन्वय, उमेदवार निवड आणि बूथ पातळीवरील कामकाजाची जबाबदारी भोळे यांच्याकडे असणार आहे.
या नियुक्त्यांमुळे भाजपने जळगाव महापालिका निवडणुकीसाठी तयारीला वेग दिल्याचे स्पष्ट होत असून, येत्या काळात संघटनात्मक हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

