महंत नामदेवशास्त्री विरुद्ध महाराष्ट्रात रणकंदन..!

0


लोकशाही संपादकीय लेख 

बीड जिल्ह्यातील भगवानगडचे गादीपती महंत नामदेव शास्त्री यांनी ‘मंत्री धनंजय मुंडे खंडणीखोर नाहीत, ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत, भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे….’ अशा प्रकारचे वक्तव्य दिले. एवढेच नव्हे तर पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे निर्दोष असल्याचे वक्तव्य केल्याने नामदेव शास्त्री विरुद्ध महाराष्ट्रात एकच वादळ उठले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करण्याची मानसिकता समजून घेतली पाहिजे. त्यांना मारहाण झाल्यानंतर साहजिक त्याची प्रतिक्रिया उमटणारच.. अश्या आरोपीची बाजू घेऊन त्यांचे समर्थन त्यांनी केले. परंतु आपण बोललो ते चुकीचे होते, हे लक्षात येताच हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे घुमजाव केले. संतांनी अशा पद्धतीने आपले वक्तव्य बदलणे, हे त्यांना शोभणारे नाही. संतांकडून जातीपातीचे राजकारण करणे तर अपेक्षितच नाही. कारण भगवानगड हे वंजारी समाजाचे जसे श्रद्धास्थान आहे, तसेच इतर जाती धर्माचे सुद्धा श्रद्धास्थान आहे. त्यामुळे जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्व जाती-धर्माचे देश श्रद्धास्थान आहे. राजकारण्यांचा वास सुद्धा साधुसंतांना लागायला नको. परंतु अलीकडे जातीच्या नावाने संतांचा उदो उदो होतो, ही बाब चांगली नाही. त्यामुळे वरून कीर्तन आतून तमाशा असा प्रकार अध्यात्मातही होतोय का? असा संशय अलीकडे बळावत चालला आहे.

संत आपल्या भोळ्या भाबड्या भाविकांच्या निर्माण झालेल्या गोतावळ्याचा दुरुपयोग करतात, असे संत आसाराम बापू आणि राम रहीम यांचे बाबतीत सिद्ध झाले आहे. आसाराम बापूंना त्यांच्या कृत्याबाबत कोर्टाकडून शिक्षा झाली. ते जेलमध्ये सजा भोगत आहेत. तरीसुद्धा संत आसाराम बापूंवर अन्याय झाला, ते आमचे दैवत आहेत. म्हणून अद्यापही आसाराम बापूंचे भक्त त्यांचा घरात फोटो लावून त्यांची पूजा करतात. मंत्री धनंजय मुंडे हे भगवानगडचे एक भाविक म्हणून त्यांची पाठराखण करतोय. असे वक्तव्य करणाऱ्या महंत नामदेव शास्त्री महाराजांच्या वक्तव्यातच राजकारण असल्याचे स्पष्ट दिसून येते. एक चायनलच्या प्रतिनिधींनी महंत शास्त्रीची यासंदर्भात मुलाखत घेऊन त्यांना प्रश्न विचारला.. वाल्मीक कराड हे सुद्धा तुमचे भक्त आहेत. ते भगवानगड चे भाविक आहेत. म्हणून त्यांनी केलेल्या निर्घुण हत्येचे समर्थन करणार का? यावर शास्त्रीजी निरुत्तर झाले. धनंजय मुंडे यांच्या बाबतीत मीडिया ट्रायल होतो आहे, असेही विधान करून मीडियालाही शास्त्रींनी दोषी ठरवले. मीडियाने संतोष देशमुख हत्या प्रकरण जर लावून धरले नसते तर संतोष देशमुखच्या आधी वाल्मीक कराड आणि त्यांच्या गँगनी केलेले अनेक खून जसे पचविले, तसे संतोष देशमुख हत्याकांडातही उघडकीस आले नसते. हत्यारे वाल्मीक कराड आणि त्याचे साथीदार उघड माथ्याने वावरले असते. त्यामुळे एवढी मोठी आध्यात्मिक व्यक्ती महंत नामदेव शास्त्री यांनी मीडियावर खापर फोडणे हे अशोभनीय आहे. भगवानगडावर जाऊन मयत देशमुख संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आपली व्यथा मांडली, तेव्हा हेच नामदेव शास्त्रीय कुटुंबियांची बाजू घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे वक्तव्य करून संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे असे वक्तव्य केले. आणि आपल्या मूळ वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. हेही संतांना शोभणारे नाही. एकंदरीत अध्यात्मिक स्थान असलेल्या भगवानगडाची प्रतिमा महंत नामदेव यांचेमुळे खालावली आहे. गडाची प्रतिमा मलीन झाली आहे.

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री हे ‘गड हे राजकारणाचे केंद्र बनता कामा नये’ म्हणून २०१५ साली बीड जिल्ह्याच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या गडावर परंपरेने होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याला विरोध केला. दसरा मेळावा गडावर होऊ दिला नाही. शेवटी गडाच्या पायथ्याला त्यावर्षी पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेतला. केवळ पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैमनस्य असल्याने धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून धनंजय मुंडेंना गडावर दसरा मेळावा घेण्यास नकार देऊन महंत नामदेव शास्त्री यांनी राजकारण केले. कारण धनंजय मुंडे यांचेकडून गडाला आर्थिक रसद पुरवली जात असल्याचा आरोप पंकजा मुंडे समर्थक करत आहेत. त्यामुळे मुळात राजकारणी असलेल्या महंत नामदेव शास्त्रींनी राजकारण गडावर होऊ देणार नाही, असा आव आणतात हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. म्हणूनच धनंजय मुंडे आतापर्यंत गडावर कधी मुक्कामाला गेले नसले तरी आता भगवानगडावर जाऊन शास्त्रीजींच्या पायथ्याशी लोटांगण घालणाऱ्या धनंजय मुंडेने गडाचा आशीर्वाद घेऊन गड माझ्या पाठीशी आहे, महंतांनी मला निर्दोष ठरवले असल्याचा दावा करण्याच्या नादात स्वतःचे पाय खोलात अडकवून घेतले आहे. या प्रकारामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकंदरीत महंत नामदेव शास्त्री हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक असून त्यांचे ज्ञानेश्वरी वरील प्रवचने प्रतिभाषाली होतात. परंतु महंत शास्त्री यांच्या या भूमिकेमुळे वंजारी आणि मराठा समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांचे महाराष्ट्रात सर्वत्र निषेध होतो आहे. त्यांचे पुणे येथे ७ तारखेला होणारे कीर्तन रद्द करण्यासाठी मराठा समाजाने आंदोलन पुकारले आहे. आपल्या कीर्तनातून समाजाचे प्रबोधन करणाऱ्या संतांच्या विरोधात आंदोलन केले जाते, ही संतांच्या दृष्टीने शोकांतिका आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.