महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा मेसेज; रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट!

0

महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा मेसेज; रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट!

जळगाव भुसावळ
मुंबई–चेन्नई दरम्यान धावणाऱ्या महानगरी एक्स्प्रेसच्या एका डब्यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘आयएसआय’ असा देशविरोधी मजकूर लिहिलेला संदेश आढळल्याने बुधवारी मध्य रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली. सदर मेसेजमध्ये ‘गाडीत बॉम्ब आहे’ अशी धमकीही असल्याने रेल्वे प्रशासनाने तत्काळ सर्व प्रमुख स्थानकांवर हाय अलर्ट जारी केला.

सकाळी सुमारे आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर दाखल होताच रेल्वे सुरक्षा बल (RPF), लोहमार्ग पोलीस (GRP) आणि श्वान पथकाने तातडीने तपासणी सुरू केली. बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करून संपूर्ण गाडीतील प्रत्येक डब्याची, सामानाची व प्रवाशांच्या वस्तूंची सखोल झडती घेण्यात आली.

या कारवाईदरम्यान कोणतीही स्फोटक सामग्री किंवा संशयास्पद वस्तू आढळली नसल्याने गाडी सकाळी नऊ वाजता पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली. प्रवाशांची सविस्तर चौकशी करून सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक पी.आर. मीना यांनी सांगितले की, “हा संदेश खोडसाळपणाचा भाग असावा, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने कसून तपासणी करण्यात आली.” या घटनेनंतर जळगाव, भुसावळ आणि इतर स्थानकांवर वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.