मधुकर साखर कारखाना कामगारांची व्यथा

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव जिल्ह्यात 42 वर्षापासून सुरू असलेला फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना कर्जात बुडाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे अखेर तो कारखाना खाजगी कंपनीस विक्री करण्यात आला. कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कारखान्यावरची मालकी गेली. ते आता खाजगी कंपनीच्या अधीन झाले. शेतकऱ्यांची सामूहिक मालकी आता खाजगी व्यक्तीकडे गेली. त्यामुळे गेली 42 वर्षे या परिसरातील शेतकऱ्यांनी आपला कारखाना म्हणून त्याचे जतन केले, त्या कारखान्याची मालकी गेल्याने शेतकरी पराधीन झाले आहेत. आपल्या हक्कासाठी संचालक मंडळाकडे मोठ्या दिमाखाने आपली बाजू मांडायचे. ते हक्क आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राहिलेले नाही.

ही परिस्थिती ऊस उत्पादकांची तीच कामगारांची सुद्धा आहे. मधुकर सहकारी साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांनी आपला कारखाना, शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना म्हणून जीवापाड मेहनत घेतली. वेळेवर पगार झाला नाही तरी कारखान्याचे कामकाज सुरू ठेवले. कारखान्याचे उत्पादन अर्थात साखरेचे होणारे उत्पादन कधी बंद पडू दिले नाही. गेल्या दोन-तीन वर्षात कारखान्याची आर्थिक स्थिती ढासळली गेली. कारखाना डबघाईस आला, व कारखाना कोट्यावधींच्या कर्जाच्या खाईत लोटला गेला. जिल्हा बँकेने शेवटी कारखाना जप्त केला. न्यायालयाच्या माध्यमातून तो जप्त करण्यात आला आणि अखेर जे काही 70 ते 80 कोटी रुपयांची कर्जाची थकबाकी होती, तेवढी रक्कम त्या कारखान्याच्या विक्रीतून बँकेला मिळाली. बँकेला हे व्यवहारिक धोरण घेण्याशिवाय पर्याय नव्हता अन्यथा जिल्हा बँकेचा आर्थिक तोटा वाढून बँकेला दिशेने वाटचाल करावी लागली असती. म्हणून जळगाव जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असली तरी संचालक मंडळाला हा कठोर निर्णय घेणे क्रमप्राप्त होते. बँकेने कारखान्याची विक्री करून आपल्या कर्जाची रक्कम मिळवली. बँकेने आपले हित साधले.

कारखान्याचे संचालक मंडळ नामाविराळे राहिले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे शेतकरी आणि विशेषता कारखान्यात काम करणारे मजूर मात्र वाऱ्यावर सोडले गेले. गेल्या दोन-तीन वर्षापासून कारखान्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार दिले गेले नाही. त्यांची देणी आहेत. कारखान्याकडून त्यांचे देणे पूर्ण झाले पाहिजे होते. शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट देण्याची जबाबदारी होती. ती पार पडली गेली. परंतु कर्मचाऱ्यांच्या देण्याचे काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. जळगाव जिल्हा बँकेने कारखान्याची विक्री केली तेव्हा कर्मचाऱ्यांची जी देणे राहिली आहे, त्याचा हिशोब करून तेवढी रक्कम विक्री मूल्यात समाविष्ट केली असती, तर आज कामगारांवर संकट ओढावले नसते. परंतु ते का झाले नाही? हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो.

आता मधुकर सहकारी साखर कारखान्यातील कामगार म्हणतात, आधी कामगारांची देणे पूर्ण करा मगच मधुकर साखर कारखान्याचे उत्पादन सुरू करा. कामगारांची देणे दिल्याशिवाय कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा या कारखान्यातील कामगारांनी दिला आहे. त्यामुळे मधुकर सहकारी साखर कारखाना विकत घेणाऱ्या खाजगी मालकापुढे हे संकट असले तरी मालक व ते संकट टाळू शकतात. बिचाऱ्या कामगारांवर अन्याय होता कामा नये. कारखान्यात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना कामावर घेणे अथवा न घेणे हा निर्णय मालकाचा असला, तरी सर्व कर्मचाऱ्यांची देणी प्रथमदर्शनी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर किती कर्मचाऱ्यांना कारखान्यात घ्यायचे हा अधिकार आता पूर्णतः खाजगी मालकाचा राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.