मढेघाटात ५० विद्यार्थ्यांच्या पथकावर मधमाशांचा हल्ला

0

मढेघाटात ५० विद्यार्थ्यांच्या पथकावर मधमाशांचा हल्ला

३५ हून अधिक विद्यार्थी जखमी; १० जणांची प्रकृती गंभीर तर दोघांना पुण्यात हलवले

पुणे (प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या मढेघाट परिसरात रविवारी संध्याकाळी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. सह्याद्रीच्या कुशीत ट्रेकिंगचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या ५० विद्यार्थ्यांच्या पथकावर आग्या मोहोळाच्या मधमाशांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात ३५ हून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक जखमी झाले असून, दुर्गम भागात स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या बचावकार्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

पुण्यातील एका खासगी साहसी पर्यटन संस्थेमार्फत ५० विद्यार्थ्यांचा हा ट्रेक आयोजित करण्यात आला होता. यामध्ये १४ ते १७ वयोगटातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. मढेघाट ते उपंडा असा ट्रेकचा मार्ग ठरलेला होता. घाट उतरून मध्यभागी असलेल्या गर्द झाडीच्या परिसरातून विद्यार्थी जात असताना अचानक झाडावर असलेल्या आग्या मोहोळाच्या मधमाशा उठल्या आणि त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. हजारो मधमाशांनी अचानक हल्ला केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच घबराट पसरली. जीव वाचवण्यासाठी विद्यार्थी डोंगरदऱ्यात सैरभैर धावू लागले. डोंगरकडा आणि घसरणीचा रस्ता असल्याने पळताना अनेक विद्यार्थी पडून जखमी झाले, तर मधमाशांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यांवर आणि हातापायांवर अनेक दंश केले.

घटनेचे गांभीर्य ओळखून ट्रेक प्रमुखांनी तातडीने ‘तोरण माची’ हॉटेलचे मालक अभिजित भेके यांच्याशी संपर्क साधला. भेके यांनी ही माहिती स्थानिक सोशल मीडिया ग्रुपवर प्रसारित करताच केळद गावचे माजी सरपंच रमेश शिंदे आणि स्थानिक तरुणांनी मदतीसाठी कड्याच्या दिशेने धाव घेतली. स्थानिक तरुणांनी झाडीत आणि कड्यामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. १०८ रुग्णवाहिका पोहोचण्यापूर्वीच ग्रामस्थांनी स्वतःच्या खासगी वाहनांतून जखमी विद्यार्थ्यांना वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. ज्ञानेश्वर हिरास आणि त्यांच्या पथकाने विद्यार्थ्यांवर युद्धपातळीवर उपचार सुरू केले.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मधमाशांच्या दंशामुळे विद्यार्थ्यांना मळमळणे, उलट्या होणे, चेहरा आणि डोळ्यांवर भीषण सूज येणे तसेच रक्तदाब कमी होणे असा त्रास होत होता. गंभीर जखमी असलेल्या १० विद्यार्थ्यांपैकी दोघांना अधिक उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले आहे. इतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दुर्गम भागात ग्रामस्थांनी दाखवलेल्या या देवदूतासारख्या मदतीमुळे सर्व विद्यार्थ्यांचे प्राण वाचले असून परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.