जिल्ह्यात लम्पीचा कहर; पशुधनाचे लॉकडाऊन

0

लोकशाही संपादकीय लेख

भारतात तसेच महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे दोन वर्षे अत्यंत जिकीरीचे गेले. लाखो लोकांना महामारीच्या नियंत्रणासाठी शासनस्तरावर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. साथरोग कायद्यातंर्गत कडक अंमलबजावणी करण्यात आली. सर्व रूग्णालये कोरोनाग्रस्त रूग्णांमुळे हाऊसफुल्ल होती. लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. ते दिवस आठवले तर अंगावर शहारे येतात. माणसाला भावना असल्याने आपले दु:ख व्यक्त करणे शक्य होते. परंतु आता मुक्या पुशधनावर कोरोनासदृष्य लम्पी नावाच्या रोगाने कहर माजवलाय. त्यामुळे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी साथरोग नियंत्रण काद्यातंर्गत त्याच्या नियंत्रणासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील 15 पैकी 10 तालुक्यात पशुधनावर लम्पीच्या रोगाने कहर केलाय. त्यात आतापर्यंत 24 जनावरे दगावली आहेत. एकूण 648 जनावरे या लम्पीमुळे बाधीत झाली आहेत. विशेषत: लम्पी साथरोग गायवर्ग जनावरांमध्ये जोमाने पसरत आहे. त्यामुळे लम्पीचा प्रादुर्भाव असो अथवा नसो गायीच्या दूधाविषयी जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तथापि लम्पीचा प्रादुर्भाव झालेल्या गायीच्या दुधापासून कसलाही संसर्ग होत नाही. असे तज्ञांकडून सांगण्यात येत असले तरी लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर होत नाही. त्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे.

लम्पी रोगाचा देशभरात प्रादुर्भाव होत आहे. जळगाव जिल्ह्यातही लम्पीने आपले पाय पसरले आहे. विशेषत: जिल्ह्यातील दहा तालुक्यात हा रोग जनावरांमध्ये दिसून येत असला तरी रावेर तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना साथ रोगाचे नियंत्रण करण्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागत होत्या, त्याचप्रमाणे पशुधनावरील लम्पी रोगाच्या नियंत्रणासाठी तशाच उपाययोजना केल्या जात आहेत हे विशेष.

जनावरे मोठ्या प्रमाणात एकत्र येत असतील तर त्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. जनावरे खरेदी – विक्रीचे बाजारात मोठ्या प्रमाणात एकत्र आणली जातात. ती जनावरे खरेदी विक्रीचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. एकप्रकारे जनावरांचे लॉकडाऊन करण्यात येत आहे. ज्या गोठ्यात जनावरे एकत्र बांधली जातात ते गोठे निर्जंतुकीकरण करून विरळपणे जनावरे बांधावीत अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.  जळगाव जिल्हा परिषदेकडून लम्पी रोगाचे प्रतिकार करण्यासाठी मार्गदर्शनार्थ हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक प्रकारच्या आधुनिक सुख – सुविधा उपलब्ध असतांना कोरोनासारख्या महामारीच्या साथ रोगाने धुमाकूळ घातला. त्याचप्रमाणे पशुधनाच्या आरोग्यासंदर्भात विविध उपाययोजना उपलब्ध असतांना लम्पीसारख्या साथरोगाचा प्रादुर्भाव व्हावा हा एक विलक्षण योगा-योगच म्हणता लागेल. आधुनिक युगात जेवढ्या सोयी – सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. तेवढ्याच समस्या आ वासून उभ्या राहत आहेत.

ग्लोबल वार्मिंगचाच हा प्रकार म्हणावा लागेल. भर पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असतांना सुध्दा वाढत्या तापमानामुळे सर्वत्र हाहाकार माजविला आहे. उन्हाळ्याचे तापमान परवडेल पण हे पावसाळ्यात तापमानाने लोक हैराण झाले आहेत. एकंदरित निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही. त्यासाठी निसर्गावर होणारे अतिक्रमण टाळणे आपले कर्तव्य आहेत. पृथ्वी तलावर मानवी लोकसंख्या ज्या झपाट्याने वाढते आहे. त्याला नियंत्रण घालणे आवश्यक आहे. वृक्षतोड थांबवले पाहिजे. वृक्ष संवर्धन जोपासले तरच निसर्ग आपल्याला साथ देईल अन्यथा कोरोना, लम्पीसारखे साथरोगाचा प्रादुर्भाव वाढेल आणि मानवासमोर या समस्या वाढतील एवढे मात्र निश्चित. बिचारे मुके प्राणी लम्पीमुळे त्रस्त असतील तर ते सांगणार कुणाला ?

Leave A Reply

Your email address will not be published.