वसुबारसच्याच दिवशी लंपी रोगाने घेतला गाईच्या वासराचा बळी

0

 

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क:

दिवाळीच्या मंगल दिनाला सुरवात झाली आहे. मात्र आज दिवाळीच्या पहिल्याच वसुबारसच्या दिवशी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शेतकरी नरेंद्र पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्या गाईच्या गोऱ्ह्याचा लंपी आजाराने बळी घेतला. यामुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

ऐन वसुबारसच्या दिवशी लंपी या आजाराने गोऱ्ह्याचा मृत्यू झाल्यामुळे कुलकर्णी कुटुंब व परिसरातील शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत. या गोऱ्ह्याला लंपी आजाराची लागण झाली होती. गोऱ्ह्यावर डॉक्टरांनी उपचारासाठी खूप प्रयत्न केले. गेल्या आठ दिवसापासून सातत्याने उपचार चालू होते. मात्र प्रयत्नांना यश आले नाही आणि अखेर काल ऐन वसुबारसच्या दिवशी या गोऱ्ह्याचा मृत्यू झाला. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे ३० हजाराचे नुकसान झाले आहे. सदर गोऱ्ह्यावर कुलकर्णी परिवाराचे जिवापाड प्रेम होते. त्यामुळे एखादा घरातील सदस्य गेल्याप्रमाणे हळहळ परिसरात व्यक्त केली जात आहे.

लंपी या आजाराने गेल्या काही महिनाभरात अनेक गुरांवर आपला विळखा घातला होता. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या आजारामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपले पाळीव पशु गमावले असून, शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनातर्फे या आजारावर उपाययोजना सुरू असून अनेक जीव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.