उज्ज्वला योजनेंतर्गत 200 रुपयांचे अनुदान मिळणार; ‘असा’ करा अर्ज

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे, त्यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. मात्र आता तुम्हाला दिलासा मिळणार आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारनं प्रत्येक एलपीजी सिलेंडरवर अनुदानाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक सिलिंडर मागे 200 रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे. पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कराच्या कपातीच्या निर्णयासोबत एलपीजीवर अनुदान मिळाल्यानं सर्वसामान्यांना दुहेरी दिलासा मिळाला आहे.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला 12 सिलिंडर दिले जातात. सध्या एलपीजी सिलिंडरचे दर 1000 रुपयांच्या दरम्यान पोहोचले आहेत. केंद्राच्या एलपीजी अनुदानाच्या सहाय्यतेमुळं ग्राहकांना सिलिंडर 800 रुपयांत उपलब्ध होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलिंडर वरील अनुदान बंद आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयामुळं सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.

200 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय

आर्थिक उत्पन्न विशिष्ट निकषापेक्षा कमी असलेल्या महिलांना उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मोफत गॅसचं कनेक्शन दिलं जातं. योजनेच्या आरंभीच्या काळात माफक किंमतीत गॅस सिलिंडर उपलब्ध केले जात होते. कोविड प्रकोपाच्या काळात अनुदानाला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला होता. सदर योजनेच्या अंतर्गत केंद्रानं 200 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस सिलिंडरच्या भावानं उच्चांक गाठल्यामुळं सर्वसामान्यांच्या खानपानाचं बजेट कोलमडलं होतं. सिलिंडरच्या वाढत्या दरामुळं महिलांनी पुन्हा चुलीचा मार्ग पत्करला होता.

असे तपासा अनुदान

– सर्वात पहिल्यांदा http://www.mylpg.in वर जा.

– स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुमच्या कंपनीचा सिलिंडर निवडा.

– साईन-इन करण्याद्वारे नवीन यूजर पर्यायावर क्लिक करा.

– तुमचा आयडी यापूर्वीच असल्यास साईन-इन करा.

– तुमच्याकडे आयडी नसल्यास पुन्हा नव्याने बनवा.

– तुमच्या नोंदणीनंतर ‘सिलिंडर बुकिंग पाहा’ वर टॅप करा.

– तुमची सिलिंडर संख्या व अनुदान तपशील पाहा.

– तुम्हाला सिलिंडर बुकिंग करुनही अनुदान न मिळाल्यास फीडबॅक बटनावर क्लिक करा.

उज्ज्वला योजनेसाठी नोंदणीची प्रक्रिया

तुम्ही अद्याप उज्ज्वला गॅस योजनेसाठी नोंदणी केली नसल्यास तुम्हाला अर्ज करावा लागेल. उज्ज्वला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फॉर्म डाउनलोड करा. एलपीजी वितरांकडे अर्ज जमा करा. तुमच्या अर्जावर संपूर्ण पत्त्यासह जनधन खात्याचा तपशील हवा. तुम्ही अर्ज जमा केल्यानंतर सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन त्या आधारावर कनेक्शन दिले जाईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.