यांचं सालं एक बरंय.. त्यांनी केलं तर प्रेम आणि आम्ही केला तर बलात्कार?

राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी : माझ्याबरोबर राहायचं असेल तर...

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्याच्या राजकारणावर अचूक निशाणा साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात पुन्हा तुफान फटकेबाजी केली. त्यांनी राजकीय पक्षांच्या बदलत्या भूमिकांवर जोरदार प्रहार केला. मनसेच्या भूमिकेवर कायम प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांची त्यांनी चांगलीच हजेरी घेतली. त्यांच्या सूचक वक्तव्यांमुळे आगामी निवडणुकीत मनसेच्या वाटचालीवर त्यांनी प्रकाश टाकला.

शिवसेनेच्या बदलत्या राजकारणावर त्यांनी वरळी येथील मेळाव्यात प्रकाश टाकला. शिवसेनेचा जन्म झाला. १९६६मध्ये त्यांनी पहिली निवडणूक प्रजा समाजवादी सोबत लढवली. त्यानंतर मुस्लिम लीग सोबत युतीही केली होती. त्यानंतर काँग्रेसला पाठिंबा दिला. ८० मध्ये काँग्रेसही युतीही केली. नंतर भाजपसोबत गेले. त्या त्यावेळी जी परिस्थिती असते त्यानुसार पक्ष निर्णय घेतात. पण त्यांची ती बदलली ती परिस्थिती. यांचं सालं एक बरं आहे. त्यांनी केलं तर प्रेम आणि आम्ही केला तर बलात्कार, असा जोरदार पलटवार त्यांनी टीकाकारांवर केला.

लोकसभेत मोदींना आपण का पाठिंबा दिला याविषयी त्यांनी भूमिका स्पष्ट केली. लोकसभेत मोदी शिवतीर्थावर आले होते. त्यावेळी त्यांच्यासमोर मी म्हटलं मला ज्या ज्यावेळी बोलायचं ते बोललो. मी असं काही म्हटलं का की मी बोललो नाही. मी म्हणालोच नाही. माझं बोलून झालं. माझं सुटलं ते सुटलं. जे बोललो त्याला आधार होता. जे चांगलं कराल त्याला चांगलं म्हणू. जे वाईट त्याला वाईट म्हणू, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

यावेळी त्यांनी विरोधकांचा आणि टीकाकारांचा खरपूस समाचार घेतला. अनेकांना वाटतं राज ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना भेटलं नाही पाहिजे. भेटलं नाही पाहिजे? समोरच्याने सांगितलं चहा प्यायला ये तर काय सांगू घरीच पी. तुम्ही काय वेगळं सांगाल? मला ते भेटायला येतात तेव्हा मी तुम्हाला विकत नाही. माझा मराठीचा बाणाही बोथट करत नाही. येतात, फोन करतात, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

लहानपणापासून अनेक पराभव आणि विजय पाहिले. पराभवाने खचलो नाही आणि विजयाने हुरळून गेलो नाही. खचलेल्या पिचलेल्या लोकांचं मला नेतृत्व करायचं नाही. माझ्याबरोबर राहायचं असेल तर ठाम राहा. जे महाराष्ट्रासाठी करायचं, मराठी माणसासाठी करायचं आहे, हिंदुंसाठी करायचं ते करणारच आहोत. आज नाही, उद्या, उद्या नाही परवा. पण होणारच आहेत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.