पूर्वीच्या प्रेमसंबंधाचा राग; तरुणाकडून सोशल मीडियावर तरुणीचे खासगी फोटो व्हायरल

0

पूर्वीच्या प्रेमसंबंधाचा राग; तरुणाकडून सोशल मीडियावर तरुणीचे खासगी फोटो व्हायरल

जळगाव : एकतर्फी प्रेमातून सुटका घेतलेल्या तरुणीला आपल्या वैयक्तिक आयुष्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. तिच्यासोबतचे खासगी फोटो सोशल मीडियावर अश्लील भाषेत पोस्ट करत, एका तरुणाने तिची बदनामी करण्याचा संतापजनक प्रकार केला आहे. ५ एप्रिल रोजी ही घटना उघडकीस आली असून, पीडितेच्या तक्रारीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एक शिक्षण घेणारी तरुणी काही वर्षांपूर्वी नातलगांच्या गावाला गेली असताना तिची ओळख एका तरुणाशी झाली. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. मात्र, काही काळानंतर संबंधित तरुणाच्या वर्तणुकीमुळे तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले.

प्रेमसंबंध तुटल्याचा राग मनात बाळगून त्या तरुणाने तीन वर्षांपूर्वी दोघांचे खासगी फोटो कुटुंबाच्या कॉमन व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये बैठक घेऊन विषय मिटवण्यात आला होता. त्यावेळी तरुणाने क्षमा मागून भविष्यात अशा वागणुकीची पुनरावृत्ती न करण्याची हमी दिली होती. त्यामुळे तक्रार दाखल न करता प्रकरण मिटवण्यात आले.

मात्र, ५ एप्रिल रोजी तरुणीच्या काकांनी आणि मावशीनं तिच्या घरी भेट दिली असताना, रात्रीच त्या तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तरुणीचा एक खासगी फोटो अश्लील भाषेत अपलोड केला. फोटो पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा स्क्रीनशॉट घेतला. दोन तासांनी तो फोटो डिलीट करण्यात आला, मात्र तोवर तो अनेकांच्या निदर्शनास आला होता.

पीडितेच्या कुटुंबीयांकडून सध्या तिच्या विवाहासाठी योग्य स्थळ पाहिले जात आहे. या माहितीची खबर संबंधित तरुणाला लागल्याने त्याने तिची बदनामी करून लग्न मोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे तरुणी मानसिक धक्क्यात असून, तिच्या कुटुंबीयांनी तत्काळ शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित तरुणाविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार तसेच अन्य संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.