काठमांडू
नेपाळमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळाला आहे. बुढी गंडक नदीला अचानक आलेल्या पुरामुळे तीन पूल वाहून गेले असून, नदीकाठची घरे आणि दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत. रविवारी सकाळी गोरखा जिल्ह्यातील बुढी गंडक नदीला आलेल्या पुरामुळे चुमनुबरी परिसरातील वस्त्या, पूल आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.
पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बांधकाम छावणीतील तसेच जलविद्युत प्रकल्पातील काही साहित्यही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेतला जात आहे.
भूस्खलनामुळे पूर आल्याचा अंदाज
चुमनुबरी ग्रामीण नगरपालिका-६ मधील लोकपा आणि चुमलिंगदरम्यान सियार नदीत भूस्खलन झाल्यामुळे नदीचा प्रवाह अडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच चुमचेट येथील उंगिलुंग नदीजवळ भूस्खलन होऊन पाण्याचा प्रवाह अडकल्याचीही शक्यता आहे. मात्र, पुराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रविवारी पहाटे चारच्या सुमारास उंगिलुंग आणि सियार नद्यांच्या दिशेने मोठे आवाज ऐकू आल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. नदीच्या पाणीपातळीत सतत चढ-उतार होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने बुढी गंडक नदी परिसरात पुराचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. नदीच्या पाण्याची पातळी धोकादायकरीत्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना नदीपासून दूर राहण्याचे आणि उंचावरील सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्राधिकरणाने समाजमाध्यमांवरील संदेशातून पूर ओसरेपर्यंत नदीच्या परिसरात जाणे टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदीकाठच्या आणि सखल भागातील रहिवाशांना विशेष सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, पुराचे भीषण दृश्य दाखवणारे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

