जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यातील एका अभियंत्याला ईडीची भीती घालत त्याची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. भुसावळ शहरातील पन्नास वर्षीय अभियंत्याची अज्ञात सायबर भामट्यांनी २६ जून रोजी फोन करत, तुमच्या विरुद्ध ईडी कार्यालयामध्ये तक्रार आल्याचे सांगत, १५ लाखाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुम्हाला केव्हाही अटक होईल, अशी भीती घालून फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत गुरुवारी २७ जून रोजी सायंकाळी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील पन्नास वर्षीय अभियंत्यास २६ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास फोन आला. बीएसएनएल कार्यालयातून बोलत असून तुमचा फोन दोन तासात बंद होईल, असे त्यांना सांगण्यात आले. फिर्यादीने कारण विचारले असता तुम्ही मोबाईल क्रमांकावरून गैरप्रकार केला असून त्याबाबत मुंबई येथे तक्रार दाखल झाली आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर दहा वाजेच्या सुमारास त्यांना दुसरा कॉल आला. त्या व्यक्तीने टिळक नगर पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक विनायक बाबर बोलत असल्याचे सांगितले, तुमच्या विरुद्ध टिळक नगर पोलीस स्टेशन मुंबई येथे तक्रार दाखल झाली असून, फिर्यादीला विविध कागदपत्रे मागविण्यात आली. फिर्यादीने कागदपत्र पाठवल्यानंतर त्यांना सायबर भामट्यांनी ऑफिसचे बनावट पत्र पाठवले. तुमच्या नावाने अटक वॉरंट तयार असून ते थांबायचे असल्यास पंधरा लाख रुपये रक्कम द्यावी लागेल, असा दम भरला.