पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाला धडकी देणारी कसरत

0

गोकुळ कोळी, लोकशाही नेटवर्क

मनवेल ता. यावल: अल्पवयीन मुलांनी काम करणे हा कायद्याने गुन्हा समजला जातो. पण पोटाची खळगी भरण्यासाठी आजही काही भटक्या जमातीतील अल्पवयीन मुले-मुली दोरीवरची कसरत करताना दिसत आहेत. खरे तर याचा विचार करून सरकारी यंत्रणाने या घटकांसाठी योग्य ती दिशा देऊ करणे गरजेचे आहे.

पाठीवर बिऱ्हाड घेऊन भटकंती करणारे हे भटक्या जमातीतील डोंबारी पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी जाऊन कसरतीचे खेळ दाखवतात. त्यात अवघ्या 15 ते 16 वर्षाची मुलगी जीव धोक्यात घालून दोरीवरची कसरत करते. काळजाचा ठोका चुकविणारे तिचे दोरीवरचे खेळ उपस्तीतांची टाळ्यांची दाद मिळवून जातात. बक्षिसरुपी पैसे व शाबासकीही मिळते. मात्र, त्या अल्पवयीन मुलीच्या भवितव्याचे काय असा प्रश्न खेळ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो.

अगदी सकाळीच एखाद्या गावाच्या रस्त्यावर, चौकात ढोलकीचा आवाज सुरू होतो. ढोलकीचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी जमू लागते. आई-वडिलांच्या हाता खांद्यावर बागडण्याच्या, शाळेत जाण्याच्या वयात ती अल्पवयीन चिमुकली जीवावर बेतेल असे कसरतीचे खेळ करून दाखवते. जमिनीपासून 10 फूट उंचीवर काठीच्या सहाय्याने बांधलेल्या दोरीवर त्या चिमुकली चे खेळ पाहण्यासाठी आलेले थबकतात. स्वतःचा तोल सांभाळत कधी दोरीवरुन चालायचे तर कधी दोरीवर एकावर एक रचलेल्या प्लेटवरून चालायचे अशी ही जीवघेणी, चित्तथरारक कसरतीचे प्रयोग ती अल्पवयीन मुलगी करून दाखवते.

या भटक्या जमातीच्या लोकांकडे उपजीविकेसाठी दुसरे कसलेच साधन नसल्याने यांचा प्रवास असाच सुरू असतो. सध्या या लोकांचे खेळ मनवेल परिसरात सुरू असून ठिकठिकाणी ही कसरत पहावयास मिळत आहे. महाराष्ट्र शासन असो की केंद्र शासनाने साक्षरता अभियान व अन्य समाजापयोगी उपक्रम समाजातील दुर्लक्षित घटकांना उपयुक्त ठरतात. मात्र, या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहचत नाहीत. अशा भटक्या जमातीतील मुला-मुलींना शैक्षणिक उपक्रम कधी कामी येणार, ही जीवघेणी कसरत कधी थांबणार असा सवाल उपस्थित झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.