“कुठे जातात टॉपर मुली?”: प्रश्न जरा गंभीर आहे!

0

लोकशाही विशेष लेख

सहजच स्क्रोल करता करता समोर दिसलं की, “कुठे जातात टॉपर मुली?” खरंच विचार करायला लावणारा गंभीर प्रश्नच हा..! आताच्या काळात स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालते, ती त्याच्या एवढीच शिकते, एवढीच काय, त्याच्यापेक्षा जास्त शिकते, वरून प्रत्येक निकालात तीच बाजी मारते अन् हीच सुशिक्षित टॉपर मुलगी नंतर कुठे हरवते?

समाजाचे जे मुख्य स्तंभ आहे जिथं तिने असायला हवं तिथं तर ती दिसतच नाही… ना समाजकारणात दिसते, ना राजकारणात! असते ती इथच आजूबाजूला, हा पण करत असते न जॉब तिच्या शिक्षणावर. पैसा मात्र ती कमवून आणते त्याच समाजाच्या भेकड चौकटीत गुरफटून आणि त्यात मग तिचं अस्तित्व नाहीच मुळात! ह्याच्या त्याच्या मताने करते जॉब; पण तिचे निर्णय-परखड मत ती मांडू शकते का खरंच?

मग कुठे जाते टॉपर मुलगी, आदर्श असणारी कधीकाळी! कुठेतरी ओढत असते संसाराचं रहाटगाडं, सांभाळत असते मूलबाळ! हे सगळ यशस्वी स्त्रीने करू नये का मग? असं नाही. करावं, पण ती कोणाची आई, ताई, बायको आणि वैगरे शिवाय तिला तिचंही अस्तित्व आहेच… तिने घेतलेल शिक्षण कागदोपत्री नसून त्याला कृतीत आणून तीच काहीतरी अस्तित्व आहे!

हो! मान्य आहे अगदीच विरोधात नसतं जाता येत, चौकटी सहज बदलत नसतात, पण गोष्टी हँडल करतांना परत त्याच समाजाच्या भेकड चौकटीत बंदिस्त होऊ नये! जिथं आपणच नाही करू शकत तडजोड, तिथं तिने करावी हा साफ अन्यायच ना! मग कराव तिच्यासाठी थोड समायोजन! आम्ही तिला शिकू दिलं, एवढे एवढे मार्क्स तिला मिळाले मुळात हे तिला करू देणारे तुम्ही कोण? तुम्हाला तिने म्हटल तर की, “हो करू देईल मी तुला जॉब लग्नानंतर/ लग्नाआधी, शिकवेल पण तुला वाटतं असेल तर, तुला हवे तसे घालता येतील तुला कपडे!” चालले तुम्हाला? नाहीच चालणार… कारण तुम्हाला स्वातंत्र्य आहे! मग तसच तिलाही आहे आणि तिची मूलभूत कर्तव्ये जपत तिचे मूलभूत हक्क जगावे हा सर्वस्वी तिचाच निर्णय आहे!

तिचा टॉपर असण्याचा अभिमान असतो, पण जेव्हा चुकीच्या गोष्टींबाबत ती बोलायला जाते तेव्हा तिला सांगितलच जात न “गप बस चार पुस्तक वाचले तर काय झालं?” किंवा तिला ती स्वतः नसेल घेऊ शकत स्वतःच्या हक्कांसाठी स्टँड तर मग कसला टॉपर असण्याचा तो अभिमान? इतकं शिकून लाखोंच्या पॅकेजवाला नवरा मिळून तो आपलं आयुष्य सेटल करेल हा दृष्टिकोन बाळगून फिरत असतात टॉपर मुली आजूबाजूला इथच कुठं! आणि मग तिने कितीही काहीही केलं तरी कोंडतो हा समाज तिला गोल पोळीत! मत जुळतात, करिअर बाबतीत एकमत होत अन् स्वयंपाक पण छान करते हा विषय पुढे आला की समजत टॉपर मुली असतात कुठे?

हृदयाचा मार्ग पोटातून जातो, बिनधास्त करावं!
मग तुला नसतं का हृदय? हा ही प्रश्नच आहे न
तुला पडत नाही का कधी?
टॉपर मुलगी ना तू…!

चंचल संगीता सुनिल
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.