खेळांची पन्नाशी

0

लोकशाही विशेष लेख

मे महिन्याची सुट्टी कालही होती, आजही आहे व उद्याही राहणारच आहे. साधारणतः दीड महिन्याचा हा कालावधी बालकांच्या दृष्टीने सुवर्णकाळच. एक मे पर्यंत निकाल हाती येतात. सुट्टीचा आनंद मनमुराद घेतला जातोच. तत्पूर्वीचे पंधरा दिवस हे खेळ खेळले जातात; पण निकालाची धाकधूक मनात बाळगूनच. आपल्या या काव्यपंक्ती चांगल्याच परिचयाच्या आहेत. ‘जुने जाऊद्या मरणालागूनी’ म्हणजे नाविन्याची कास अखंड धरा.. अगदी बरोबर आहे.. पण आज आपण असे ‘चाळीस वर्षांपूर्वीचे खेळ’ त्यांचे स्मरण करून पुन्हा ताजेतवाने होणार आहोत.

उन्हाळ्याचे दिवस म्हणजे बाहेर तापणारे उन, मग दुपारी बारा ते पाच घरातच खेळ खेळायचे व पाचच्या पुढे अंगणात व मैदानात. वाडा संस्कृती व पेठ संस्कृती.. मग काय बारा मुलं सहज एकत्र यायची. मैत्र भाव जुळायचे.. दोनच निकष, एक चोरी करणारा मित्र नको व खोटे बोलणारा मित्र नको. बाकी जात पात, आर्थिक स्थिती, स्थळ, भाषा, लिंगभेद काही आड यायचे नाही. समवयस्कांचा जणू गोपाळ मेळाच. ज्यांच्या घरात एक प्रशस्त खोली असायची तेथे जमायचे मग स्वस्त व मस्त खेळ अगदी तासान तास रंगवणारे. काचा – कवड्या हा एक खेळ, फुटलेल्या बांगडीच्या काचा किंवा अगदी फडताळातले शेंगदाणेही, कवड्या मात्र एकदाच विकत आणायच्या.

दुसरी गोष्ट सागर गोट्यांची. ऐसपैस बसायचे, सागरगोटा उंच उडवायचा, झेलयचा. नऊ सागरगोटे असायचे. दोन तीन तास भुरकन जायचे. ‘पत्ते’ बदाम, इसपीक, चौकट, व किलवर. सारा मे महिना याच्या भोवतीच गुंफलेला. गणितही नकळत पक्के व्हायचे. ‘लाडू’ ३२ कळ्यांचा मग सोळा कळ्यांची वख्खय बोलायची.. डाव रंगायचे. वर्षातून एकदाच हा पत्त्यांचा संच आणायचा. खरंतर इतका जपून वापरायचा की दोन वर्ष सहज चालायचा, कारण मधे तो बाहेर यायचांच नाही, त्यालाही जणू शिस्त होती.

चॅलेंज स्वीकारणाऱ्या मुलांची गट्टी बुद्धिबळाशी जमायची. त्यातील घोडा, उंट, वजीर यांची चाल समजायला व जिंकायला खरंच बुद्धी लागायची. नवा व्यापार खेळायला सुद्धा काही मुलं पुढे यायची. यात अगदीच कंटाळा आला तर सर्वांनी गोल करून बसायचे. एक रुमाल किंवा कागदाची चिठ्ठी – तुकडाच हातात घ्यायचा व एकाने तो हातात घेऊन म्हणायचे ‘माझ्या मामाचं पत्र हरवलं, आम्हाला नाही सापडलं’ रुमाल एकाच्या मागे टाकायचा त्याने ते ओळखायचं व त्याच्या जागेवर जाऊन बसायचं. असं ही गमंतीशीर रिंगण खूप रिझवणारा ठरायचं.

एक सौम्य खेळ मुलींसाठी खास. सर्व मुलींची नावे बदलवायची. ती नावे त्यांना कानात सांगायची. ही नावे शक्यतो फुलांची, फळांची, गावांची वगैरे असायची. मुलींनी एका रांगेत ओळीने बसायचे व ज्याच्यावर राज्य असेल त्या मुलीने डोक्यावर रुमालची पट्टी बांधायची एकीने (नवीन नावाने हाक मारायची) यावे टपली मारून जावे.. हळूच तांदूळ निवडीत बसावे.. असे म्हणायचे व जिच्या डोळ्यावर पट्टी आहे तिने ओळखायचे टपली कोणी मारली. याची गंमत ही न्यारीच…

पुढे वयोगट वाढल्यावर चौथी – तिसरीत मग मनातल्या मनात ‘क, ख, ग, घ..’ म्हणायचे.. एकीने दुसऱ्याला ‘स्टॉप’ म्हणजे थांब म्हणायचे. मग ‘च’ आला तर विशिष्ट वेळात ‘च’ पासून सुरुवात असलेले नाव, गाव, फळं, फुलं, रंग असे दहा रकाने भरायचे. जो जास्त मार्क मिळेल तो जिंकणार. अशी थोडी बौद्धिक कसरत करायला लावणारा व विशिष्ट वेळेत प्रथम येणारा तो हुशार अशी एक समज असायची. दुपारी पाचपर्यंत भेळ किंवा पन्ह या पदार्थांनी खेळाची सांगत असायची.

पाच नंतर सर्वांची धूम अंगणात बाहेरच. मग पुन्हा लंगडी, पळापळी, लपाछपी असे खेळ. दगड का माती.. किंवा दगड का पाणी.. हे शून्य बजेटचे खेळ चालायचे. घराला ओटे किंवा कडे असायचे. माती म्हटले की, जमिनीवर यायचे व दगड म्हटले की, ओट्यावर जायचे. किती सहज सुंदरता होती खेळात. पण भान राहायचे नाही.

‘शिवाजी म्हणतो’ हा खेळ, ‘शिवाजी महाराज’ आदेश करणार व आपण तो पाळायचा. एक जण म्हणणार शिवाजी म्हणतो ‘नाचा’ की सुंदर नाच करायचा, म्हणजे वेडा वाकडा, पण तो नाच असायचा आणि ‘तानाजी म्हणतो’ असे शब्द उच्चारले की ती गोष्ट करायची नाही व चुकून केली तर ती आऊट.. फार काही अवघड नव्हते, पण गंमत खुपच यायची. तासभर कुठे गेला समजायचे नाही.

असाच एक खेळ डोंगराला आग लागली पळा, पळा, पळा…. स्टॅच्यु.. स्टॅच्यु म्हणजे पुतळा. फिरता फिरता थांबायचे, जी पोझ आहे त्यातच, आपण तोपर्यंत आपली ॲक्शन ही बदलायची नाही. हालचाल न करता स्तब्ध राहायचे. तो पर्यंत नाही. काही क्षणांची शांतता राखायची.

थोडीशी मारामारी करायला लावणारे खेळ म्हणजे ‘लगोऱ्या’. मोठा दगड सपाट साधारण फरशी सारखा त्यावर छोटा दगड, त्यावर त्याहून लहान दगड असे रचायचे. चेंडूने लगोरी फोडायची. तो चेंडू कोणाच्यातरी पाठीत निश्चित बसायचा. नव्हे तो खेळाचा एक भाग. विटी दांडू, डब्बा एक्सप्रेस असेच लाकडी दांडू किंवा पत्र्याचे डबा घेऊन खेळले जाणारे खेळ. पण शारीरिक व मानसिक दृष्ट्या नकळत तल्लख बनवणारे खेळ. या खेळांची आता ‘पन्नाशी’ झाली. किती फायदा किती तोटा याचा विचार नको करायला, पण आता मॉलमध्ये जाऊन मुले खेळतात.. नाईलाज असतो.. मग वाटते की, चाळीस वर्षांपूर्वी बालपण समृद्ध होते. पालक व बालक उभयपक्षी निर्धास्त राहिले व स्मृतीपटलावर हा काळ आजही चिरकाल राहिला. पुन्हा म्हणावेसे वाटते ‘लहानपण देगा देवा..’

भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.