शरद पवारांच्या राजीनाम्याचे जळगाव जिल्ह्यात पडसाद

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांमध्ये एकच खडबड उडाली. शरद पवारांच्या या अनपेक्षित घोषणेवर कुणाचाच विश्वास बसत नाहीये. काल मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवारांच्या राजकीय चरित्राच्या दुसऱ्या भागाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. त्या ठिकाणी पुस्तक प्रकाशन सोहळा बाजूला राहिला आणि शरद पवारांच्या राजीनाम्यावरच सभेत गदारोळ सुरु झाला. प्रसंगी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील तसेच इतर नेते ढसाढसा रडत होते. ‘पवार साहेबांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय बदलावा’ अशी सर्वजण मागणी करत होते. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना शब्द फुटत नव्हते. त्यांना रडू आवरत नव्हते. “राजीनामा मागे घ्या.. राजीनामा मागे घ्या..” अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून केल्या जात होत्या. शेवटी दोन दिवसांची वेळ शरद पवारांनी दिला असून, विचार करून निर्णय कळवावा अशी आग्रहाची विनंती व्यासपीठावरील नेत्यांनी केल्यानंतर सभा आटोपली. तरी शरद पवारांच्या राजीनामा निर्णयाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. जळगाव जिल्ह्यातही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ‘शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा’ अशा घोषणा दिल्या. “देश का नेता कैसा हो, शरद पवार के जैसा हो..”, “महाराष्ट्राचा बुलंद आवाज.. शरद पवार… शरद पवार…”, “पवार साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है..” अशा घोषणांनी राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यालय परिसर दणाणून सोडला होता. ‘शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस’ असे समीकरण असल्याने शरद पवारांशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस होऊच शकत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटते. याप्रसंगी जळगावच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी सांगितेल की, “पवार साहेबांचा हा निर्णय धक्कादायक आहे. अगदी स्वप्नात सुद्धा असे वाटले नव्हते, की साहेब राजीनामाचा निर्णय घेतील.” देवकारांची ही प्रतिक्रिया या सहाजिक आहे. कारण शरद पवार पक्षातून निवृत्त होतील यावरच विश्वास बसत नाही. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या राजीनामा निर्णयाने सुन्न झालेले दिसते दिसले.

 

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनामाची घोषणा केली. ती अनपेक्षित असली तरी गेल्या काही दिवसांपासून ते करीत असलेल्या वक्तव्यावरून पवार साहेब काहीतरी निर्णय घेतील असे वाटत होते. ‘भाकरी फिरवली पाहिजे’ हे त्यांचे वक्तव्य सुचक होते. ‘भाकरी फिरवली पाहिजे’ या वक्तव्याचे अनेकांकडून अनेक अर्थ काढले गेले. परंतु अजित पवारांच्या पक्षातील भूमिकेने अस्वस्थ होते, एवढे मात्र निश्चित. परंतु शरद पवारांच्या मनात नेमके काय चालले आहे, याबाबत कुणालाही अनुमान करणे फार अवघड आहे. “कुठेतरी थांबले पाहिजे.. थांबण्याची हीच योग्य वेळ आहे..” असे सांगून कार्यकर्त्यांचे तसेच पक्षातील प्रमुख नेत्यांचे पवार साहेब समर्थन करीत आहेत. परंतु नेते जिथे भाऊक होतात तिथे कार्यकर्ते हे तर होणारच. त्याचाच परिणाम म्हणजे यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यकर्त्यांनी केलेला गदारोळ होय. या चाललेल्या गदारोळा संदर्भात अजित पवारांनी मात्र बाजी मारली. त्यांनी बोलताना सुप्रिया सुळेंसह सर्वांना धमकावले. “शरद पवार साहेब यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होऊ नये अशी सर्वांचीच इच्छा आहे. असे असले तरी वयोमानानुसार त्यांनी अध्यक्ष पद सोडले तर पक्षाच्या दुसरा होणारा अध्यक्ष त्यांच्याच हयातीत आणि अनुभवातून तयार होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे वाटचाल करेल. त्यामुळे भाऊक होऊन चालणार नाही. पवार साहेब अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असले तरी पक्षासाठी त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला मिळणारच आहे. त्यामुळे भाऊक होण्याने प्रश्न सुटणार नाही. राष्ट्रवादी कुटुंबाचे प्रमुख म्हणून शरद पवार हेच राहणार आहे त्यामुळे कुटुंब प्रमुखाचे कुटुंबातील सदस्य सदस्यावर प्रेम राहणारा आहे. ते कमी होईल असे कसे म्हणता येईल..” अजित पवारांचे हे वक्तव्य पक्ष वाढीसाठी महत्त्वाचे आहे. तरीसुद्धा शरद पवार हे अध्यक्ष पदाच्या राजीनामाचा फेरविचार करतील, असे अनेकांना वाटते. तथापि पवार साहेब त्यांच्या राजीनामा निर्णयावर ठाम राहतील असेही अनेकांचे मत आहे. परंतु ‘शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण राहील’ याबाबतची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.