आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरिच्या दासा ॥

0

पंचरत्न हरिपाठातील मागणीपर अभंगात नामदेव महाराजांनी भक्तांसाठी देवाकडे जे मागणे मागितले आहे ते अलौकिक व अपरिमित आहे. पंचरत्न हरिपाठ म्हणजे वारकरी सांप्रदायाची एक छोटी खिशात मावेल एवढी भगवतगीताच…। हरिपाठाचे अभंग म्हणजे भगवंताचं चिंतन.. या हरिपाठाने हरिपाठाचा महिमा हरिपाठामधूनच मुमुक्षु जणांना सांगितला आहे.

नामदेवराय महाराज म्हणतात, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरिच्या दासा ॥ हे पंढरीनाथा, पांडूरंगा त्या कुळांचं आयुष्य आकल्प असू दे ज्या कुळांमधून भगवत्‌ भक्त जन्माला आले आणि जे दास झाले माझ्या हरिचे..  अशा भक्ताचं रक्षण करण्यासाठी कल्याण, हित व उध्दार करण्यासाठी मी ही मागणी तुमच्याकडे करतो आहे. ती कुळं कधीही नाश पावणार नाहीत ? नष्ट होणार नाहीत ? किंबहुना त्या कुळांचा कधीही क्षय होणार नाही.

संत तुकोबा, संत चोखोबा, संत सावता महाराज, संत जनाबाई, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत निळोबाराय आदिंनी देवा तूझी भक्ती केली ते मोक्षमार्गाला जातीलही, परंतु ते ज्या कुळात जन्मले ते कुळ किती पवित्र आहे ? हे अबाधित राहिले पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्वीक। तयाचा हरिख वाटे देवा ॥ देवालाही अशी कुळं आवडतात, हे कुळ उध्दरणाबाबतचे सप्रमाण उदाहरण आहे. या संतांना कल्पनेची बाधा देखील होऊ नये असे मला तुझ्याकडून मागणे मागायचे आहे. संपूर्ण विश्वासाठी जगाच्या कल्याणासाठी मागणी मागतांना संत वृत्तीच्या माणसांसाठी नामदेवांनी मागणीपर अनेक अभंगाची रचना केली. हे अभंग नितांत सुंदर आहेत.

हेची व्हावी माझी आस । जन्मोजन्मी तुझा दास ॥

पंढरीचा वारकरी । वारी चुको ने दी हरि ॥

संत तुकोबारायांनीही अनेक मागणीपर अभंग लिहिले आहेत. वरील अभंगात तुकोबाराय म्हणतात ही माझी इच्छा आहे, देवा या जन्मातच काय अनेक जन्म जन्मोजन्मी मी तूझा दास झालो पाहिजे अशी माझी इच्छा तू पूर्ण कर…। आणखी एक कर देवा तूझा विसर न पडता पंढरीची वारी आमच्या हातुन चुकणार नाही पायी चालत भजन गात आम्ही तूझ्या दर्शनाला येऊ एवढे मागणे मागतो.. या वारीत काय आहे ?

संत संग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा कल्लोळ ।

चंद्रभागेमाजी स्नान । तुका मागे हेचि दान ॥

म्हणून हया वारीत जे आहे ते अन्यत्र कुठेही नाही. तेथे अनेक संत महात्मे भेटतात आणि त्यांचा संग सर्वकाळ लाभतो आणि शिवाय अध्यात्म ज्ञानाची चर्चा, परिसंवाद विचारांची देवाण – घेवाण होते. यालाच कल्लोळ म्हणतात. चंद्रभाग, भिमा नदीत स्नान होते आणखी या पलिकडे आम्हाला दुसरे आणिक काहीच नको. तू देशील, तू दाता आहे एवढा आम्हाला विश्वास आहे. असे मागणे या नामदेवरायांसहित अनेक संतांनी देवाकडे केले. कलियुगात मानवाने आपण ज्या कुळात जन्मलो आहोत त्याचा उध्दार होण्यासाठी देवाची भक्ति केली पाहिजे. भक्ति केल्यानंतर देवाला मनोभावे आळवला तर तो निश्चितपणे प्रसन्न होतो.  तोच कल्याणपंथ, मोक्षमार्ग होय.

आजही काही माणसं अशी आहेत, त्यांना आपलं स्वत:च कुळ काय आहे ? गोत्र काय आहे ? आपल्या पिढीत आजोबा पणजोबा नंतर कोण कोण होतं याचं देखील स्मरण होत नाही ?.  समाज विज्ञाननिष्ठ जरुर असावा परंतू काहींना स्व ची माहिती केव्हाही कुणी विचारली तर ती पटापट सांगता आली पाहिजे. पैसा, धन, संपत्ती, ऐश्वर्य, नाव कमविण्याच्या नादापायी आपण संस्कृती कशी विसरत चाललो आहोत याचे भान असायला हवे …। हयासाठी पंचरत्न हरिपाठाचे नित्य वाचन केले गेले पाहिजे. ज्ञानेश्वरी तुकोबाची गाथा ही देखील वाचली पाहिजे.

रमेश जे. पाटील

आडगाव ता. चोपडा जि. जळगाव [खान्देश ]

मो. 9850986100

• एक महत्वाची सूचना

या लेखातील वरील अभंग हा संत नामदेव महाराजांच्या मागणीपर अभंग प्रकारातील (पा.नं. १३४) वारकरी सांप्रदायिक ‘पंचरत्न हरिपाठ’ गुरुपरंपरेचे अभंग, देवपूजा विधी, आरत्या व प्रार्थनासह या पुस्तकातून घेतला आहे. हा अभंग पंचरत्न हरिपाठ या स्वतंत्र पुस्तकात कदाचित वाचकांना सापडणार नाही; परंतू आळंदी येथील श्री. रंगनाथ महाराज खरात यांनी लिहलेल्या व संपादित केलेल्या पुस्तकात हा अभंग पा. नं. १३४ वर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.