नृसिह अवतार

0

भगवान विष्णूंचा चौथा अवतार म्हणजे नृसिह अवतार. हिरण्यकश्यपू नावाच्या दानवाने त्याला मिळालेल्या वराच्या बळावर उन्मत्त होऊन मांडलेला छळवाद त्याचाच पुत्र प्रल्हादाचा केवळ नारायणाचे नामस्मरण करतो. म्हणून केलेला छळ असाच उन्मत्त होऊन स्तम्भावर केलेल्या प्रहाराने स्तम्भातून प्राकट्य झालेला नृसिह अवतार आणि त्यांनी आपल्या तीक्ष्ण नखाच्या साहाय्याने हिरण्यकश्यपूचा केलेला वध हि कथा सर्वानाच माहिती आहे. तो दिवस म्हणजे वैशाख शुद्ध चतुर्दशी जो नृसिह जयंती म्हणून साजरा केला जातो. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वन्दन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन अशा नऊ भक्ती शास्त्रकार, भागवतकार यांनी सांगितल्या आहेत.

या पैकी नामस्मरण हा भक्तीचा मार्ग प्रल्हादाने स्वीकारला व कुठल्याही संकट काळात नामस्मरण सुरु ठेवले, म्हणून या अवताराचा खरा बोध हा कि भक्ताची आपल्या भक्तीवर व आपल्या उपास्यदेवतेवर अपार श्रद्धा असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे “नामस्मरण” हा भक्तीचामार्ग भगवंत प्राप्ती पर्यंत निश्चितच नेणारा आहे. म्हणून भावयुक्त नामस्मरण हे भगवंताला भक्तांशी बांधणारे आहे त्याचप्रमाणे नारायणाच्या नामात अपार शक्ती आहे. पण गरज आहे ती आपल्या सात्विक भावाची माउलीचे हरिपाठातील प्रमाण हेच सांगणारे आहे ते म्हणतात.

भावेंविण भक्ती ।
बळे वीण शक्ती। बोलू नये॥

भाव आणि भक्ती त्याच प्रमाणे बळ आणि शक्ती या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भक्तीने केलेल्या एका हरिनामाच्या जपसाधनेने काय साधले जाते याचे प्रमाण हरिपाठात माउली देतात.

हरी उच्चारिणी । अनंतपापराशी ।
जातील विलयाशी । क्षणमात्रें ॥

हरिनामाचा उच्चार अनंत पापराशीचा नाश करणारा आहे. हाच उच्चार प्रल्हादाला लहानपणी म्हणजे कयाधुच्या गर्भात असताना मिळाला आणि त्यातून परम हरीभक्त प्रल्हाद तयार झाला माउलींच्या हरिपाठातील प्रमाणात म्हटल्या प्रमाणे..

सत्वरी उच्चार । प्रल्हादी बिंबला ।
उद्धवा लाभला । कृष्ण दाता ॥

हरिनामावर अपार श्रद्धा आणि कितीही संकटे आली तरी विचलित न होता श्रद्धेने, दृढतेने हरिनाम घेणे व आपली तपस्या सुरु ठेवणे जेणेकरून भगवंत आपली कृपादृष्टी आपल्यावर ठेवेल याची प्रचिती म्हणजे नृसिह अवतार होय. योग, याग, सिद्धी याच्या पेक्षा सोपा भक्ती मार्ग म्हणजे नामस्मरण भक्ती या भक्ती मार्गाने प्रल्हादाने नारायणाची प्राप्ती केली म्हणून ज्ञानेश्वर माउलींनी हरिपाठात हरिनामाची नामस्मरण महती सांगितली. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी रामनामाची महती सांगितली पण दोघांचा अर्थ एकच अनन्य भावाने भगवंताला शरण जाणे व भावभक्तीने नामस्मरण करणे हाच बोध नृसिह अवताराचा आहे.

प्रापंचिक सुख दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात स्थितप्रद्न्य राहून आपले कर्त्यव्य व धर्मपालन करताना परमेश्वराप्रती आपली श्रद्धा कायम ठेवावी. नृसिह उपासनेत एकूण ११ नृसिहस्थाने हि महत्वाची मानली गेली आहे. त्यापैकी सहावे स्थान हे बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर येथील नृसिहाचे आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात नृसिंहाची अनेक मंदिरे आहेत त्यापैकी कोळे नृसिहपूर हे सांगली जिल्ह्यातील नीरा नृसिहपूर हे पुणे जिल्ह्यातील, वाई जवळील धोम येथे, कोल्हापूर जिल्हयातील सांगावंडे येथे, पुण्यातील सदाशिव पेठेतील मंदिर, साईखेड हे नाशिक जिल्ह्यातील मंदिर, हि काही मंदिरं आहेत. नृसिह उपासना हि फार प्राचीन आहे. याचा भक्तिपूर्वक अंतःकरणाने स्वीकार करून या नृसिह जयंतीच्या निमित्ताने भगवंत चरणी लिन होऊ या..

ओम नमो भगवते लक्ष्मीनृसिहाय

प्रा. नितीन मटकरी
विष्णू नगर जळगाव
९३२६७७८३२९

Leave A Reply

Your email address will not be published.