रावेर लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षाचा अवकाश असताना त्याचे पडसाद सर्वच राजकीय पक्षात आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीला ‘अच्छे दिन’ असल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेच्या एकही खासदार निवडून येऊ शकणार नाही, त्याचबरोबर भाजपच्या निवडून येणाऱ्या खासदारांची संख्या घटणार असल्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यात चांगली जुंपली आहे. जळगाव जिल्ह्यात असलेल्या जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे खासदार असले तरी रावेर लोकसभा मतदारसंघात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे काम चांगले असल्याने रावेर लोकसभेची जागा आगामी २०२४ च्या निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळावी अशी मागणी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी करून एक प्रकारे खळबळ उडवून दिली आहे. आमदार चंद्रकांत पाटील हे जरी अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी, महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देऊन उद्धव ठाकरे सेनेचे सहयोगी सदस्य बनले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात स्वतः आमदार चंद्रकांत पाटील हे सामील झाल्याने आता शिंदे गटाच्या शिवसेनेला रावेर लोकसभेची जागा मिळावी अशी मागणी केली आहे. ही मागणी करताना आमदार चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे की, शिवसेनेचे रावेर लोकसभा मतदारसंघात चांगले काम आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून येऊ शकतो. भाजपची ही मागणी आम्ही वरिष्ठांकडे करणार आहोत. त्याला पाठिंबा मिळाला तर ठीक, नाही मिळाला तर मम म्हणायची आमची तयारी आहे, असेही बोलून दोन्ही बाजूंवर हात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत लोकसभेच्या जागांवरून चांगलीच जुंपली आहे. त्यातच रावेर लोकसभेची जागा बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळावी, अशी मागणी करून आमदार चंद्रकांत पाटलांनी त्यात भर घातली आहे.

 

रावेर लोकसभा मतदार संघात भाजपच्या विधानसभेच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे दोनदा निवडून आल्या असताना अचानक शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे या मतदारसंघावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी दावा केला असला तरी, तो त्यांच्या वैयक्तिक दावा असू शकत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीशिवाय आमदार चंद्रकांत पाटील असा दावा करणे शक्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आमदार चंद्रकांत पाटलांच्या तोंडून हा दावा केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एकनाथ शिंदेंबरोबर असलेले शिवसेनेचे बारा खासदार हे शिवसेनेच्या चिन्हा ऐवजी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे जाहीर झाल्याने शिंदे गटाला तो फार मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे या वादावर पडदा टाकण्याऐवजी काहीतरी आगळी वेगळी मागणी करून आगीत तेल ओतण्याचे काम केले जाते जात आहे. राज्यमंत्र्यांचा विस्तार मे अखेरीस होणार असल्याचे जाहीर झाले. तथा एक जून आला तरी मंत्रिमंडळाचा विस्तारा संदर्भात सध्या चिडीचूप आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अपात्र आमदार उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये जाण्याचा तयारीत असल्याचा वावड्या उठल्याने आपल्या आमदारांना सांभाळून ठेवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर पेच प्रसंग निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारातील शिवसेना आमदारांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातील पारोळा मतदार संघातील शिवसेनेचे जेष्ठ आमदार चिमणराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे चिमणराव पाटील हे मुंबईला तळ ठोकून बसले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारोळा बाजार समिती निवडणुकीत आमदार चिमणराव पाटलांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सतीश अण्णा पाटील यांनी आमदार चिमणराव पाटील आणि त्यांच्या मुलगा अमोल पाटील यांना चारीमुंड्या चीत करून पारोळा बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकविला. स्वतः डॉ. सतीश अण्णा पाटील हे पारोळा बाजार समितीच्या सभापती पदी आरूढ झाले आहेत. त्यामुळे आमदार चिमणराव पाटील यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.