शिशूंची अदलाबदल : जीएमसीतील सावळा गोंधळ

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन महिलांच्या प्रसूतीनंतर त्यांच्या शिशूंची अदलाबदल झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवार दिनांक 2 मे रोजी सकाळी प्रसूती विभागात पाच मिनिटाच्या अंतराने दोन महिलांची प्रसूती झाली. दोन्ही महिलांची सिझेरियन केल्याने दोघांची भूल लवकर न उतरल्याने त्यांना आयसीयू मध्ये उपचारासाठी ठेवले. दरम्यान एका महिलेला मुलगी तर दुसऱ्या महिलेला मुलगा झाला. अशात परिचारिका आणि शिकावू डॉक्टरांच्या गोंधळामुळे ‘मुलगी कुणाची आणि मुलगा कुणाचा’ याचा गोंधळ उडाला. त्यामुळे प्रसूती झालेल्या एका महिलेच्या पालकांनी ‘आमचे पुरुष जातीचे मूल असताना महिला जातीचे शिशु कसे आले?’ अशी तक्रार केल्याने एकच गोंधळ उडाला. केवळ परिचारिका आणि शिकावू डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने हा प्रकार घडल्याने हा गंभीर प्रकार समोर आला. ‘प्रसुती झालेल्या महिला प्रस्तुती नंतर बेशुद्ध असल्याने त्यांना न दाखवता त्यांच्या पालकांना दाखवण्यात आले’, असे समर्थन जीएमसीतील डॉक्टरांकडून करण्यात आले. जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे पाच वर्षांपूर्वी स्थापन झाले. सुरुवातीला काळात नवीन महाविद्यालय असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, हे जरी खरे असले तरी महाविद्यालयाचे अधिष्ठाता तसेच इतर प्रमुख डॉक्टरांवर ही जबाबदारी पेलण्याची फार मोठी जबाबदारी असते. सुरुवातीला अशा प्रकारच्या घटना होत गेल्या तर रुग्णांचा अथवा रुग्णांच्या नातेवाईकांचा महाविद्यालयातील व्यवस्थापना संदर्भात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले की संशयाचे वातावरण निर्माण होते. शिशूंची अदलाबदली होण्याचे प्रकार चित्रपटात दाखवण्यात येतात. तसाच प्रकार जळगावच्या शासकीय महाविद्यालयात घडल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यापूर्वी कोरोना कालावधीत गाजले आहे. कोरोनाची लागण झालेली वृद्ध महिला दोन-तीन दिवस गायब झाल्याचे सांगण्यात आले. सर्वत्र शोधाशोध झाली. नातेवाईकांनी शेवटी पोलिसात तक्रार दिली. तिसऱ्या दिवशी सदर वृद्ध महिला मृतावस्थेत संडासमध्ये आढळून आली. कोरोना संदर्भात उपचार घेणारी ही वृद्ध महिला संडासला केव्हा गेली, त्याचा थांगपत्ता त्या वार्डात ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, परिचारिका अथवा वार्ड बॉय यापैकी कुणालाही लक्षात आली नाही. परंतु शोधाशोध सुरु करून उपचार घेणारी वृद्ध महिला रुग्णालयातून पळून गेली असल्याचा प्रकार समोर करण्यात आला. परंतु संडासमध्ये त्या वृद्ध महिलेचे प्रेत आढळून आल्याचे वृत्त संपूर्ण महाराष्ट्रात नाही, तर देशात गाजले होते. त्यामुळे यापूर्वी जळगावला वैद्यकीय महाविद्यालयाची अपकीर्ती झाल्याने त्याचा बळी मात्र वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता ठरले. म्हणून महाविद्यालयातील डॉक्टरांनी यासंदर्भात फार सतर्क राहणे आवश्यक आहे.

 

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरुवातीच्या काळात जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या जागेत सुरू असले तरी हे वैद्यकीय महाविद्यालय नवीन जागेत शासनातर्फे अद्यावत अशा वैद्यकीय कॅम्पसच्या जागेत त्याचे स्थलांतर होणार आहे. या वैद्यकीय कॅम्पसमध्ये एकाच परिसरात वैद्यक शास्त्राच्या सर्व शाखांचे महाविद्यालय जळगावपासून अवघ्या आठ किलोमीटर जळगाव-औरंगाबाद महामार्गावर चिंचोली शिवारात एकूण 75 एकर परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, होमिओपॅथी महाविद्यालय, दंत महाविद्यालय सुरू होणार आहेत. त्याच ठिकाणी सर्वच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे वस्तीगृह, स्टाफ ्वार्टर्स आदी बांधण्यात येणार असल्याने अशा प्रकारचे मेडिकल हब महाराष्ट्र जळगावत प्रथम होणार आहे. त्यामुळे प्रथम अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव खराब होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा शासकीय कारभारावर आणि त्या कारभाराच्या गलथानपणावर जनतेची टीका होते. अशी टिका या महाविद्यालयाच्या बाबतीत होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. खाजगी दवाखान्यावर अथवा तेथील उपचारा संदर्भात जो रुग्णांचा विश्वास निर्माण झाला आहे, तो याचमुळेच. परंतु सर्वसामान्यांना खाजगी दवाखान्यातील महागडे उपचार परवडत नाहीत. म्हणून शासनाने खाजगी रुग्णालयांच्या तोडीचे उपचार मिळण्यासाठी विशेष रुग्णालय उभारण्यात येत आहे. परंतु सर्वसामान्यांना शासकीय महाविद्यालयातील उपचार पद्धतीवर विश्वास निर्माण होण्यासाठी व्यवस्थापनावरील सावळा गोंधळ थांबवणे आवश्यक आहे. एवढेच निमित्ताने स्पष्ट करावयास वाटते. त्यासाठी लोकप्रतिनिधींचापण वचक शासकीय व्यवस्थापनावर असणे आवश्यक आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.