मुक्ताईनगर अवैध तस्करी पोलिसांपुढे मोठे आव्हान

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

मध्यप्रदेशातून व्हाया मुक्ताईनगर मोठ्या प्रमाणात अवैध तस्करी होतेय, असा आरोप गेल्या काही वर्षांपासून माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे वारंवार करत आहेत. तथापि पोलीस प्रशासन तथासत्ताधिकारी पक्षाच्या वतीने त्याची दखल न घेता खिल्ली उडवली गेली. परंतु परवा मध्यप्रदेशातून गुटक्याने भरलेला ट्रक स्वतः आमदार चंद्रकांत पाटलांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यामुळे मुक्ताईनगर हे अवैध धंद्याचे केंद्र असल्याचे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशातून विमल गुटख्याने भरलेला जो ट्रक पकडला गेला तो ट्रक महाराष्ट्राचा आहे. मध्यप्रदेशात विमल गुटख्याला बंदी नाही, परंतु महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे. मध्यप्रदेशातून विमल गुटख्याने भरलेला ट्रक मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्टवरून सही सलामत महाराष्ट्रात येतो कसा? चेक पोस्टवरील सुरक्षेसाठी असलेली पोलीस यंत्रणा करते काय? कारण पोलीस स्टेशनवर अवैध धंद्याला संरक्षण दिले जाते. त्याबाबत पुराव्यानिशी काही बाबी एकनाथ खडसेंनी सादर केल्या होत्या. परंतु खडसे यांच्या या दाव्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे चेकपोस्टवरवरील यंत्रणा आणि जळगाव जिल्ह्याचे पोलीस यांची हात मिळवणे झाल्याचा आरोप केला गेला. आता आमदार चंद्रकांत पाटलांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी हा विमल गुटक्याचा ट्रक पकडला. त्यावर मुक्ताईनगर पोलिसांची निष्क्रियता स्पष्ट दिसून आली. जी गुप्त माहिती आमदार चंद्रकांत पाटलांना मिळते, तशी गुप्त माहिती पोलिसांना मिळू नये? याला काय म्हणावे? पोलिसांची ही निष्क्रियता म्हणावी की अर्थपूर्ण दुर्लक्ष? परंतु जे पोलिसांनी करायला हवे होते ते त्यांना जमले नाही. ते लोकप्रतिनिधी आमदार चंद्रकांत पाटलांनी केले. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या कार्याबाबत त्यांचे अभिनंदन करणे आवश्यक आहे. कारण जे काम पोलिसांचे आहे ते काम चंद्रकांत पाटील यांनी करून पोलीस प्रशासनाला मोठी चपराक दिली आहे. एकंदरीत मुक्ताईनगर हे अवैध धंद्याचे मोठे केंद्र बनल्याचे यावरून सिद्ध झाले.

 

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात व्हाया  मुक्ताईनगर अवैध धंद्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते. यावर रोख लावला लावण्यासाठी मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवरचा चेकपोस्ट कुचकामी ठरतोय. या चेकपोस्टवरून अवैध तस्करी रोखली गेली पाहिजे. परंतु चेक पोस्टवरील यंत्रणेला गुंगारा देऊन अवैध तस्करी होत असेल, तर ती तस्करी रोखली जाणे आवश्यक आहे. तथापि चेकपोस्टवर जर अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे चेकपोस्टवरून होणाऱ्या अवैध तस्करीचे कुणीही समर्थन करणार नाही. याबाबतीत अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळणार नाही, यासाठी कसल्याही प्रकारचे राजकारण होता कामा नये. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आरोप प्रत्यारोपामुळे पोलीस प्रशासनाचे फावले. याची दखल राजकारण्यांनी घेणे आवश्यक आहे. अवैध धंद्यांबाबत आरोप करणारे एकनाथ खडसे यांचे कार्यकर्ते अवैध दंडवत गुंतलेले आहेत, असे आरोप सत्ताधारी पक्षातर्फे करून खडसेंचे राजकारण डॅमेज करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचे आहे. या प्रकारामुळे मुक्ताईनगर शहर आणि तालुक्यात वाढत्या अवैध धंद्यांमुळे अनेकांचे जीवन उध्वस्त होत असेल तर आपले राजकारण करणे थांबवावे, असेच आवाहन करावे वाटते. महाराष्ट्राट गुटक्याला बंदी असताना मध्यप्रदेशातून खुलेआम गुटखा महाराष्ट्रात येत असेल तर गुटखा खाण्यामुळे कॅन्सरला निमंत्रण देणारे अनेक कुटुंब बरबाद होत आहेत. त्याला जबाबदार कोण? कायद्याच्या रक्षण करणाऱ्या पोलिसांकडूनच योग्यरित्या कायद्याचे पालन होत नाही, हेच दिसून येते. गुटक्याबरोबर मटक्याचा सुद्धा मुक्ताईनगरमध्ये सुळसुळाट असल्याचा आरोप होतोय. मटक्याचे शहरात तसेच तालुक्यात असलेले अड्डे पोलिसांकडून उध्वस्त झाले पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. शहरात अथवा तालुक्यात सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यांचा पोलिसांनी गुप्त पद्धतीने शोध घेऊन ती नेस्तनाबूत केली पाहिजेत. पोलिसांकडून हे होऊ शकत नसेल तर लोकप्रतिनिधी आमदार चंद्रकांत पाटलांनी हे अड्डे शोधून काढले पाहिजेत का? एकंदरीत मुक्ताईनगर शहर व तालुका अवैध धंदा पासून मुक्त करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात होणारी अवैध तस्करी सुद्धा रोखण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून अवैध धंद्यावर टाकलेल्या छाप्यातून महाराष्ट्र शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल सुद्धा मिळू शकतो. त्यासाठी जळगाव पोलिसांवर अवैध धंदे बंद करण्याचे मोठे आव्हान आहे ते त्यांनी स्वीकारले पाहिजे…!

Leave A Reply

Your email address will not be published.