पाचोरा भडगाव कृ.उ.बा. निवडणुकीत रंगतदार मोड

0

 

लोकशाही संपादकीय विशेष

जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. 20 एप्रिल ला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या तारखेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, सध्या उमेदवार फोडाफोडी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या हालचाली, पॅनलचे उमेदवार निश्चिती, आदी जोरदार हालचाली सुरू आहेत. पाचोरा भडगाव बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार दिलीप वाघ आणि विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यातील मनोमिलनाच्या सुरस कथा ऐकायला मिळत होत्या. त्यांच्यात दोन-तीन गुप्त बैठकीही झाल्याचे कळते. परंतु जागा वाटपावरून त्यांचे मनोमिलन फिस्कटल्याचे कळते. त्यानंतर दिलीप वाघ यांनी काल स्वतः महाविकास आघाडी तर्फे स्वतंत्र पॅनलद्वारे बाजार समिती निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे जाहीर करून दिलीप वाघ आणि किशोर आप्पा पाटील यांच्यातील मनोमिलनावर टाकला. पाचोरा भडगाव बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडीतर्फे ताकदीने लढवून बाजार समितीमध्ये विजय मिळवण्याचा दावा दिलीप वाघ यांनी केल्याने आमदार किशोर आप्पा यांच्या मनसुभ्यावर पाणी फिरले आहे. येत्या 20 एप्रिल नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे स्वतंत्र पॅनल आणि महाविकास आघाडीच्या पॅनल मध्ये खरी लढाई होणार असली तरी भाजपमधील अमोल शिंदे, सतीश शिंदे गटाची भूमिका कशी राहील याकडे मात्र लक्ष केंद्रित झाले आहे. अमोल शिंदे यांचे काका सतीश शिंदे हे पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत. त्यांना बाजार समितीचा अनुभव असल्याने त्यांचा रोल सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे. शिंदे गट भाजपचा असला तरी किशोर आप्पा पाटील आणि शिंदे गट यांचे विळा भोपळ्याचे नाते आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी लढवून आमदार किशोर आप्पा पाटलांच्या नाकी नऊ आणले होते. अवघ्या तीन चारशे मताच्या फरकाने अमोल शिंदे पराभूत झाले. आता तर अमोल शिंदे भाजपचे अधिकृत उमेदवार असतील. त्यामुळे पाचोरा तालुक्यात भाजपात दोन गट असून एक गट असली तर एक गट नकली असल्याचा उल्लेख आमदार किशोर पाटलांनी करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. अमोल शिंदे गटाला भाजपातील नकली उपमा दिल्याने शिंदे गटाचा विरोध आमदार किशोर आप्पा ओढवून घेत आहेत.

 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात होते. त्यावेळी माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वाघ आणि किशोर आप्पा पाटील यांनी आपापसात समजवता करून बँक निवडनुकीतून दिलीप वाघ यांनी माघार घेऊन किशोर आप्पा पाटील बँक संचालक म्हणून निवडून आले होते. त्याची भरपाई जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत किशोर आप्पा पाटील यांनी केली. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत संचालक म्हणून दिलीप वाघ बिनविरोध निवडून आले. असाच फॉर्मुला चोपडा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत करण्याचा किशोर आप्पा पाटलांच्या स्वप्नावर पाणी फिरले. त्यामुळे पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न निवडणुकीत आता चांगलीच रंगतदार होणार आहे. त्यातच महाविकास आघाडीचे स्वतंत्र पॅनल निवडणुकीत उतरणार असल्याने विरोधकांच्या गोटात वेगळ्याच हालचालींना वेग आला आहे. बाजार समितीची निवडणूक ही आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम करणार आहे. त्यामुळे ही अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे हे पॅनल राहणार असून त्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे तालुक्याच्या नेत्या आणि किशोर आप्पा पाटलांची भगिनी पहिल्यांदाच आमने-सामने राहतील. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रूपाने पॅनल द्वारे आमने-सामने लढत असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत हे प्रत्यक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे पाचोरा भडगाव बाजार समिती निवडणुकीला आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. तिकडे भाजपाचे अमोल शिंदे हे सुद्धा भाजपतर्फे विधानसभा निवडणूक लढवणारे प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे 20 एप्रिल नंतर निवडणूक प्रचाराला प्रचाराचा धुरळा उडणार आहे. 18 संचालकांच्या जागांसाठी किती पॅनल उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात राहतील त्याचे चित्र स्पष्ट होणार असले तरी दोन्ही तालुक्यातील मिळून 2700 उमेदवार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील…!

Leave A Reply

Your email address will not be published.