सेनेच्या आक्रोश मोर्चाने बंडखोरांना हादरा..!

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्वच आमदार बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटात सामील झाले. सुरत गुवाहाटी आणि गोव्याच्या मुक्कामानंतर पोलीस बंदोबस्तात सर्व काल मुंबईत आले आणि आज विधानसभा अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत शिंदे गटाकडून अध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या बाजूने शिवसेनेचा व्हीप झुगारून मतदान केले. गेल्या दहा-बारा दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये या बंडखोरांच्या विरोधात असंतोष व्यक्त होत होता. परंतु काल संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वात आणि जिल्ह्यातील तिन्ही जिल्हाप्रमुख तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांच्या निघालेल्या भव्य आक्रोश मोर्चाने बंडखोर आमदारांना चांगलाच हादरा बसला आहे.

एकही आमदार, मंत्री उपस्थित नसताना जिल्ह्याभरातील शिवसैनिकांची आक्रोश मोर्चात असलेली उपस्थिती वाखाणण्याजोगे होती. जिल्ह्यातील शिवसैनिक स्वयंभू या आक्रोश मोर्चात सामील झाले होते. अनेक वेळा शक्तिप्रदर्शन करायचे म्हणून जिल्ह्यात स्तरावरून ग्रामीण भागात गाड्या पाठवून त्या गाड्या भरून कार्यकर्ते आणले जातात. परंतु अशी स्थिती कालच्या शिवसेनेच्या आक्रोश मोर्चात नव्हती. शिवसेना ही अशी राजकीय संघटना आहे की तिथे व्यक्तीवर नव्हे तर संघटनेवर प्रेम शिवसैनिक करतात. हे कालच्या आक्रोश मोर्चाने सिद्ध केले. आक्रोश मोर्चात सामील झालेला शिवसैनिक खऱ्या अर्थाने आक्रोश करीत होता. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदारांनी बंडखोरी नव्हे तर गद्दारी केली. त्यांनी शिवसेनेशी गद्दारी करण्याआधी आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा होता. त्यांनी केलेल्या बंडखोरी बाबत संताप व्यक्त करताना बंडखोरांना शिव्यांची लाखोली वाहिली जात होती. त्यामुळे शिवसेना स्टाईल काय असते, हे त्यांनी दाखवून दिले.

मोर्चाच्या वेळी पाऊस चालू होता. तथापि पावसात सुद्धा शिवसैनिक मोर्चातून विचलित झाले नाहीत. त्याचबरोबर सध्या ग्रामीण भागात शेतीच्या कामाची व्यस्तता असतानाही वेळात वेळ काढून शिवसैनिक मोर्चात सामील झाले होते. याचा अर्थ आपल्या लोकप्रतिनिधी कडून त्यांचा विश्वास घात झाला, ही भावना त्यांच्यामध्ये व्यक्त होत होती. जळगाव, पारोळा, पाचोरा येथे बंडखोरांच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी आपले मत प्रदर्शन केले. त्यानंतर बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करणारे मोर्चे काढले. शिवसेना नेते संजय राऊत यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळले. प्रतिमेला जोडेमार आंदोलन केले. परंतु बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या आंदोलनात मात्र जोश दिसत नव्हता. जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील यांचा शिंदे मंत्रिमंडळात समावेश होणार हे निश्चित आहे. त्यानंतर जिल्ह्यातील आणखी एका बंडखोर आमदाराची शिंदे मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश होण्याची शक्यता आहे.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील यांचे जळगाव जिल्ह्यात आगमन होईल. शक्ती प्रदर्शन करण्याचे नियोजन आतापासून सुरू असल्याचे कळते. किमान दहा हजाराचा जमाव  गुलाबरावांच्या स्वागतासाठी जमवणार असल्याचे ठरले आहे. तथापि किमान पाच हजारांचा जमाव जमवून शक्ती प्रदर्शन करू शकतात. त्यात कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहतील काय ? याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. जिल्ह्यातील तिन्ही जिल्हा शिवसेनाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने आणि समाधान महाजन हे कालच्या आक्रोश मोर्चात अग्रभागी होते.

गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक धरणगावचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ हे अग्रभागी तर होतेच, परंतु गुलाबराव पाटलांवर शिव्यांची लाखोली वाहून संताप व्यक्त करत होते. गुलाबराव वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीए कडून धमकीचा फोन आल्याचा किस्सा सुद्धा गुलाबराव वाघांनी मोर्चेकर्यांसमोर सांगितला. म्हणजे अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, हे शिवसैनिकांनी दाखवून दिले. त्यातच आगामी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार गुलाबराव वाघ असतील अशी घोषणा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केल्याने धमाल उडाली.

पारोळा मतदार संघातून चिमणरावांच्या विरोधात डॉक्टर हर्षल माने हे शिवसेनेचे उमेदवार राहतील आणि जळगाव शहर मतदार संघातून विद्यमान भाजप आमदार राजू मामा भोळे यांचे विरोधक विष्णू भंगाळे यांना  शिवसेनेची उमेदवारी दिली जाणार असून आतापासून विष्णू भंगाळे कामाला लागले आहेत. 2019 विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपात युती असल्याने युती धर्म पाळून विष्णू भंगाळे यांनी निवडणूक लढवली नाही. युती म्हणून सेनेतर्फे राजू मामा भोळे यांचा प्रचार केल्याने राजू मामा निवडून आले, असा दावा शिवसेनेतर्फे करण्यात येतो, आणि त्यात तथ्यंश आहे. शिवसेनेच्या आक्रोश मोर्चातील शिवसैनिकांचा जोश कायमस्वरूपी राहील तर बंडखोर आमदारांना ते महागात पडणार आहे.

तथापि दोन अडीच वर्षाच्या कालावधीत राजकारणात कसे बदल होतात यावर हे सर्व अवलंबून आहे. सध्या जळगाव जिल्ह्यातील संपर्कप्रमुख संजय सावंत आणि विलास पारकर यांनी आपल्या जिल्हाप्रमुखासह जिल्हाभरात दौरे करून शिवसैनिकांचा कौल आजमावणार असल्याचे सांगितले. याच दौऱ्यातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भातही उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर स्थानिक स्वराज्य संस्था युती होईल की नाही, हे चित्र आज तरी स्पष्ट झालेले नसले, तरी या संदर्भात वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यानुसार निवडणुका होतील, असे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील बंडखोर आमदारांची अशी कृती होईल यांची गेल्या सहा महिन्यापासून कुणकुण लागली होती. परंतु अशा प्रकारे एकनिष्ठ म्हणवणारे शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खूपसतील आणि गद्दारी करतील असे वाटत नव्हते. त्यामुळे आगामी काळात या बंडखोरांसाठी सुखाचे दिवस राहणार नाही, असा इशाराही या आक्रोश मोर्चा द्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर या बंडखोरांचे स्वागत कसे होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.