युती अन्‌ आघाडीची ‘महा’सत्त्वपरीक्षा !

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

अठराव्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून सारेच पक्ष आपल्या तयारीला लागले आहेत. बरेच पक्ष भारतीय जनता पार्टीच्या गळाला लागूले असून समोर बोटावर मोजण्याइतकेच पक्ष शिल्लक राहिले असले तरी भाजपासाठी ही निवडणूक एकतर्फी नक्कीच होणार नाही. 2014 साली मोदी लाट आली होती, त्या लाटेत बरेच विरोधी पक्ष भुर्इसपाट  झाले असतांनाही विरोधकांना मोदींच्या विरोधात मोट बांधता आली नाही. सन 2019 मध्येही विरोधक ऑक्सिजनवरच दिसून आले. त्याकाळात काँग्रेसने राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून समोर आणले असतांनाही त्याचा फासरा फरक पडला नाही. आताच्या निवडणुकीत भाजपाने बरेच मित्र पक्ष जोडल्याने ते सत्तेचा सोपान गाठणार असले तरी त्यांच्यासाठी ही सत्त्वपरीक्षाच ठरणार आहे. एकट्या भाजपाला ही सत्त्वपरीक्षा द्यावी लागणार नाही तर काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्र्रवादीलाही त्याचा सामना करावा लागणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील दोघाही लोकसभा मतदारसंघावर भाजपाची पकड मजबूत असली तरी त्यांना सावधगिरीने सामना करावा लागणार आहे. जवळ बसलेले कधी घात करतील हे सांगता येत नसल्याने भाजपही सावध झाला आहे. महायुतीसमोर जसे आव्हानांची मालिका आहे तशीची स्थिती महाविकासचीही आहे. जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीत कुठेही एकवाक्यता दिसत नाही. रावेर लोकसभा मतदारसंघावरुन त्याची प्रचिती देखील आली आहे. या मतदारसंघात भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी हे उमेदवारी मिळाल्याच्या जोशात आहेत तर त्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील हे रोज नवनवे दावे करुन हवा काढण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहेत. जळगाव मतदारसंघात उद्धव ठाकची शिवसेना कंबर करुन असली तरी त्यांना ‘तगडा’ उमेदवार गवसत नसल्याने त्यांच्या समोरही आव्हानांचा डोंगर तयार झाला आहे.

लोकसभेला जास्तीत जास्त जागा मिळवणे आणि पैकी बहुसंख्य जागा जिंकून दाखवणे हे सध्याच्या घडीचे सर्वात मोठे आव्हान सर्वच पक्षांसमोर आहे. लोकसभेच्या कामगिरीवरच महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीत जास्त वाटा मिळण्याची शक्यता आहे. भाजपाच्या विजयावर शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तर महाविकासच्या विजयावर काँग्रेसचे अस्तित्व अवलंबून आहे. प्रशासनावर उत्तम पकड असलेला, तसेच कार्यकर्त्यांबरोबर चांगला कनेक्ट असलेला नेता अशी गिरीश महाजन यांची प्रतिमा आहे. या प्रतिमेचाही निकालही जिल्ह्यातील दोन्ही निकालासोबत लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या बरोबरच राष्ट्रवादी पक्ष न्यायालयीन लढाईलाही तोंड देत आहे. सुरुवातीच्या काळात निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ पक्ष असल्याचा निकाल दिला आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनीही तोच निकाल गिरवला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ताज्या सुनावणीत घड्याळ चिन्ह निवडणुकीपुरते अंतिम निर्णयाच्या अधीन राहून दिले असल्याचे स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादीला जाहिरात देऊन त्याचे स्पष्टीकरण देण्याची सूचना केली आहे, हा पक्षासाठी मोठा धक्का असतांना शरद पवारांची तुतारी रावेर लोकसभेत कशी फुंकली जार्इल हे येणाऱ्या काळात दिसणार आहे.

एकंदरी काय तर युती आणि आघाडीला आगामी काळात ‘महा’सत्त्वपरीक्षेचा सामना करावा लागणार आहे हे स्पष्टच !

Leave A Reply

Your email address will not be published.