जिनवाणीमुळे जीवनात परिवर्तन

0

प्रवचन सारांश  –  5 ऑगस्ट 2022

जीवनात ‘जिनवाणी’मुळे  परिवर्तन घडून येते. परिवर्तन घडवून येते की घडवावे लागते ? परिवर्तनाचे प्रकार किती असतात ? याबाबतचे विश्लेषण ‘मेरी भावना’ प्रवचन मालेमध्ये करण्यात आले. “रहे सदा सत्संग” ह्या ओळीचा अर्थ डॉ. पदमचंद्रमुनी यांचे सुशिष्य पू. जयपुरंदरमुनी यांनी अनेक उदाहरणे देऊन पटवून दिला. जळगाव येथील स्वाध्याय भावनात जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्यश्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा. आदी ठाणा 7 यांच्या पवित्र सानिध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. त्यात सकाळी होणाऱ्या प्रवचनाचा शेकडो श्रावक-श्राविका लाभ घेत असतात.

हे देखील वाचा:- 

जन कल्याणाची शक्ति गुरूंमध्ये..

परिवर्तन हा जीवनाचा किंवा निसर्गाचा नियमच आहे. जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत, प्रत्येक क्षणी परिवर्तन हे होतच असते. मनुष्य देह हा नाशवंत किंवा नश्वर आहे. या देहात देखील क्षणोक्षणी परिवर्तन होत असते. परिवर्तनाचे दोन महत्त्वाचे प्रकार सांगण्यात आलेले आहेत. एक ‘सम्यक परिवर्तन’ व ‘दुसरे मिथ्या परिवर्तन’ जे सम्यक परिवर्तन असते ते अध्यात्म्याच्या अंगाने असते. त्याला ‘सम्यक परिवर्तन’ असे म्हणतात. जे भौतिकतेने झालेले परिवर्तन असते त्याला ‘मिथ्या परिवर्तन’ असे म्हणतात. सत्संगामुळे जीवनात काय चांगले बदल घडू शकतात याबाबतचे उदाहरण स्पष्ट करताना त्यांनी नारद  मुनींची उद्बोधक कथा सांगितली.

‘आगम प्रवचन’ मालेमध्ये पु. जयधुरंदरमुनी यांनी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधले. ‘वितराग’ अवस्थेमध्ये पोहोचायचे असेल तर प्रमाद सोडला पाहिजे. असे आगाम गाथेत  सांगण्यात आलेले आहे. ‘प्रमाद’ म्हणजे काय ?असा सामान्य माणसाला प्रश्न विचारला असता तो त्याचे उत्तर ‘आळशी’ असणे असे मिळते. परंतु प्रमाद याचा खरा अर्थ ‘उत्साह नसणे’ हा होय. आपण प्रमादी नव्हे तर अप्रमादी बनावे. जीवनात मिळालेला प्रत्येक क्षण हा अत्यंत अनमोल असा असतो.  परंतु अनेकदा आपल्याकडूनच व्यर्थ वेळ घालवला जातो. त्याला ‘टाईमपास’ असे म्हटले जाते.

वास्तविक हे आहे की, जीवनात मिळालेला प्रत्येक क्षण सत्कारणी लावला पाहिजे असा अत्यंत मोलाचा संदेश आजच्या प्रवचनातून देण्यात आलेला आहे. प्रत्येक क्षणाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी एक दाखला दिला की, एक वर्षाचे मोल नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारले पाहिजे, एका महिन्याची किंमत पोटात जास्त काळ राहिलेल्या बाळाच्या आईला विचारा, एका आठवड्याची किंमत रोजगार न मिळालेल्या आपल्या परिवाराचे पोट न भरू शकणार्‍या त्या मजुरास विचारा, एका मिनिटाचे महत्त्व रेल्वे मिनिटासाठी चुकलाय त्याला विचारा, एका सेकंदाचे महत्त्व ज्या खेळाडूचे सुवर्णपदक एका सेकंदाने हुकले त्या खेळाडूला त्याचे महत्त्व विचारा ! जीवनात प्रत्येक क्षण मोलाचा असतो. प्रत्येक क्षण सत्कारणी लावून ‘वितराग’ अवस्थेकडे प्रवास करूया.. असे आवाहन आजच्या प्रवचनातून पु. जयधुरंदर मुनी यांनी केले.

—– ¤¤——

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका  दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…..

Leave A Reply

Your email address will not be published.