श्रीपाल व मैनासुंदरी कथा प्रेरणादायी..

0

प्रवचन सारांश 07.10. 2022

श्रीपाल यांचे चरित्र व कथा कर्माची कथा होय. केलेला चांगल्या वा वाईट कर्मांचे फळ हे त्यानुसार मिळते. धवलशेठ श्रीपालला ठार मारण्याचे प्रयत्न करत असतो, त्याचे वाईट करण्यात तो व्यस्त असतो. तरी देखील श्रीपाल हा धवलशेठशी चांगला वागतो, त्यांचा जीव वाचवितो. धवलशेठ त्याचा स्वभाव बदलवत नाही. कडू निंब ज्याला गुळात घोळले तरी त्याचा कडूपणा जात नाही तसा धवलशेठचा वाईट स्वभाव काही जात नाही याबाबतचे श्रीपाल चरित्र व कथा आजच्या प्रवचनात पू. जयपुरंदर मुनी यांनी सांगितले. नऊपद ओलीचा आज सातवा दिवस होता. नऊपद साधनेबाबतचे महत्त्वही सांगितले गेले.

प्रवचनाच्या आरंभी ध्यानाचे ४ प्रकार सांगण्यात आले आहे. त्यातील धर्मध्यान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. श्रावकाने रौद्र ध्यानात कधी जाऊ नये. चोरी करायची असेल तर तो चोर आधी तयारी करतो, चोरीचे नियोजन करतो, योजना आखतो. चोरीचा किंवा कुकर्म, वाईट बाबींचा सतत मनात विचार करणे म्हणजे रौद्र ध्यान होय. श्रीपाल चरित्रात धवलशेठ याने श्रीपाल यांना ठार मारण्याचे षडयंत्र रचले. त्याला समुद्रात ढकलून दिले. श्रीपाल नसल्यामुळे आता श्रीपालचे सर्व जहाज त्यातील संपत्ती आणि त्याच्या दोन्ही पत्नी माझ्याच आहे असा वाईट विचार करत असतो. धवलशेठ दिसायला बाहेरून चांगला पण आतून मात्र खूप दुर्जन असतो. राजा कनककेतू यांना गत वेळी कर दिला नसल्यामुळे धवलशेठला शिक्षा झालेली होती. असे पुन्हा घडू नये म्हणून धवलशेठ स्वतःच राजा कनककेतु यांच्या दरबारात कर भरण्यासाठी हजर होतो. तो राजसभेत पोहोचल्यावर राजाच्या दरबारात उच्च पदी बसलेल्या श्रीपालला पाहतो. त्याला ओळखतो आपण तर श्रीपालला समुद्राच्या पाण्यात ढकलून दिले होते हा जिवंत कसा? याचे आश्चर्य देखील त्याला वाटते.

श्रीपालचे चांगले चाललेले पाहून त्याच्या बद्दल धवलशेठच्या मनात पुन्हा वाईट विचार येतात. त्याच्याविरुद्ध पुन्हा षडयंत्र रचले जाते. समाजात भांड जमात असते. त्यांच्या टोळीच्या म्होरक्याला पकडून श्रीपाल माझा मुलगा आहे असे नाटक रचतात. असे केल्याने राजाच्या मनात श्रीपाल विषयी शंका निर्माण करायची व राजाच्या मनात श्रीपाल बद्दल चीड निर्माण करायची म्हणजे राजा चिडून श्रीपालला शिक्षा देऊ शकेल व श्रापालचा काटा आपोआप काढला जाईल असे धवलशेठ व त्याचा कुमित्र जमवतात. या योजनते धवलशेठ यशस्वी होतो. श्रीपाल हा भांड आहे त्याने आपल्याला फसविले असा पक्का समज राजा करून घेतो व श्रीपाल बद्दल कुशंका निर्माण होते. श्रीपाल व त्याला शोधून आणणाऱ्याला फाशीची शिक्षा राजा सुनावतो. राजाची मुलगी गुणमाला जी श्रीपालची पत्नी असते ती आपल्या पित्याला श्रीपालचा खरा परिचय देते. श्रीपाल भांड नाही ते ही सिद्ध करून देते. श्रीपाल ह्यांच्या दोन राण्या धवलशेठच्या जहाजासोबत असलेल्या श्रीपाल यांच्या जहाजात आहेत त्या याबाबत खरे काय ते सांगतात. भांडची कसून चौकशी होते त्यात असे समजते की, धवलशेठच्या सांगण्यावरून असे आम्ही केले. त्यासाठी आम्हाला धवलशेठकडून एक लाख सुवर्ण मुद्रा दिल्या आहेत अशी कबुली ही ते देतात. राजाला खरे काय ते समजते. धवलशेठ व भांड यालाच दंड केला जातो.

विशाल मनाचा व दयाळू वृत्तीचा श्रीपाल धवलशेठला माफ करतो व राजाला विनंती करतो की, धवलशेठ वाईट असला तरी माझ्या पित्यासम आहे त्यामुळे त्याला व भांड याला दिलेली शिक्षा माफ करावी असे सांगून धवलशेठला तिसऱ्यांदा जीवदान मिळते. कुणी किती दुष्ट स्वभावाचा, कावेबाज असू शकतो हे पहायचे असेल तर धवलशेठसारख्या व्यक्तीकडे बघावे. त्यांच्यावर उपकार केले तरी ते समोरच्याबद्दल कृतज्ञता भाव ठेवत नाही, त्यांच्याबद्दल वाईट व अपकाराचीच भावना ठेवत असतात. असे डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य पू.जयपुरंदर मुनी यांनी प्रवचनात सांगितले.

जळगाव येथील स्वाध्यायभवन येथे जयगच्छाधिपती १२ वे पट्टधर आचार्य श्री. पू. पार्श्वचंद्र म.सा., डॉ. पदमचंद्र म.सा. आदिठाणा ७ यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास सुरू आहे. यामध्ये श्रीपाल चरित्राची पुढील रंजक आणि उत्कंठा वाढवणारी कथा आगामी प्रवचनात पुढे सांगितली जाईल, श्रावक-श्राविकांनी स्वाध्यायभवन येथे अवश्य उपस्थित रहावे व प्रवचनाचा लाभ तर घ्यावाच परंतु नऊपद ओली, आयंबील साधना पुढे चालू ठेवावी असे आवाहन करण्यात आले. प्रवचनानंतर मुमुक्षु दिशाजी पगारीया यांच्या कुमकुमचा कार्यक्रम स्वाध्यायभवनात पार पडला. जळगाव येथील केवलचंदजी व सौ. सरलादेवी पगारीया यांची नात तसेच निलेश व ममता पगारीया यांची कन्या दिशाजी यांचा उदयपूर येथे 11 ऑक्टोबर रोजी दीक्षा समारोह आयोजला आहे. त्या निमित्त श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, जळगाव व साधुमार्गी जैन संघ जळगाव यांच्यातर्फे हा कुमकुमचा कार्यक्रम आयोजण्यात आला होता.

———□■□■ ———

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

 

Leave A Reply

Your email address will not be published.