संयोग-वियोग दुःखाला सकारात्मक भाव ठेऊन सहन करा…

0

 

[] प्रवचन सारांश – 31 ऑक्टोबर 2022 []

 

संयोग-वियोगाचे दुःख सहन करायचे असेल तर मनात कोणतेही नकारात्मक भाव न ठेवता अंजना प्रमाणे सहनशील वृत्तीने त्या दुःखाना सामारो जावे असे आवाहन आजच्या प्रवचनात पू. जयपुरंदर म.सा. यांनी केले.

ममत्व, आसक्ती भाव असल्याकारणाने वियोग सहन करण्यासाठी त्रास होत असतो. व्यक्ती असो व वस्तू त्यांचा एक ना एक दिवस वियोग होणारच, ती आपल्यापासून दूर जाणारच. जन्मास आलेला जीव मृत्यूमुखी पडणार हे सत्य आहे. जे आहे ते आपले नाही, नष्ट होणारे आहे हे कायम ध्यानत ठेवले तर दुःखाची तीव्रता कमी होते. या बाबीचे चिंतन केले तर सहनशीलता वाढेल. संसारातील व्यक्तींचे लक्ष संयोगापेक्षा वियोगाकडे अधिक असते. ‘मेरी भावना’ या प्रवचन श्रुंखलेत डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर म.सा. यांनी प्रवचनाच्या माध्यमातून महत्त्वाचा संदेश दिला.

आर.सी. बाफना स्वाध्याय भवनात जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्य श्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा., अनुप्पेहा ध्यान प्रणेता डॉ. पदमचंद्र म.सा, आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम आता अंतिम चरणात पोहोचला आहे.

इष्ट वियोग होत नाही परंतु ते फक्त समजले तरी दुःख होते. अमुक होणार हे समजल्यावर नकारात्मक भाव मनात येतात व त्यातून दुःख सागरात ती व्यक्ती बुडते. कल्पना रंजन असलेले किंवा मानसिक दुःख फार मोठे असते. नकारात्मक कल्पना सोडून द्यावी. तुम्ही बँकेत बचत किंवा ठेव कशासाठी ठेवतात? ही रक्कम आजारपणा, कठीण परिस्थिती आली तर उपयोगाला येईल. हे नकारात्मक कारण समोर ठेऊन ती बचत केली जाते. ही बचत चांगल्या कामासाठी उपयोगात आणेल असा सर्वसामान्य माणूस विचार करत नाही. माणसाने सकारात्मक विचार करावा असे आवाहन प्रवचनातून करण्यात आले.

इष्ट वियोग व अनिष्ठ संयोग आला तरी ते स्थितप्रज्ञाप्रमाणे सहज कसे सहन करावे हे शिकायचे असेल तर हनुमंताची आई अंजना हिच्यापासून शिकायला हवे. सुरू असलेली पवन कुमार व अंजना यांची कथा पुढे सांगितली. 12 वर्षे अंजनाचा पतीशी संयोग झालेला नाही तरी देखील ती सहन करत असते. पनवकुमार युद्धासाठी जाणार आहेत हे तिला समजल्यावर पत्नी कर्तव्य म्हणजे पतीला राजतिलक करण्यासाठी, औक्षण करण्यासाठी ती तयार झाली परंतु पवन कुमार याने तिरस्काराने अंजनाला लाथ मारून हकलून दिले. लाथ मारली तेवढा तर स्पर्श झाला हा सकारात्मक विचार तिने केला. दुःख सहन करायचे असेल तर सकारात्मक विचार करावे. मोठ्यांपासून ते दुःखात कसे वागले, कसे सहनशील राहिले हे शिकण्यासारखे आहे. चकवा पक्षांचे रुदन पवनकुमारने ऐकले व त्यांचे हृदय परिवर्तन झाले. हे पक्षी एक रात्र विरह सहन करू शकत नाही अंजना तर गेल्या 12 वर्षांपासून विरह सहन करते आहे. रात्रीच्या रात्री पवनकुमार अंजनाला भेटले. त्या भेटीत ती गर्भवती राहिली. सासरच्या मंडळीने तिच्यावर संशय घेतला, चारित्र्यावर संशय घेतला व तिला नगरातून बहिष्कृत केले. माहेरी देखील तिला बहिष्कृत केले गेले. गर्भवती अंजनाने ते दुःख कसे सहन केले या विषयी पुढील कथेत ऐकता येईल भाविकांनी पुढील प्रवचनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

1 नोव्हेंबर रोजी पू. चांदमलजी महाराज साहेब यांचा स्मृतिदिन साजरा करायचे असून त्या निमित्ताने तपस्याने करावी असे आवाहनही करण्यात आले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.