विचार व चारित्र्यात शुद्धता असावी – पूज्य जयमलजी म.सा.

0

 प्रवचन सारांश – 06.09.2022 

आचार्य पूज्य जयमलजी महाराज साहेब यांनी आपल्या सगळ्यांना आचार व विचार, चारित्र्यात शुद्धता असावी अशी मोलाची शिकवण दिलेली आहे. त्याचे आपण अवश्य अवलंब करावे, असा मोलाचा संदेश डॉ. पदमचंद्र म.सा. यांनी आजच्या प्रवचनातून दिला. 315 वा त्रिदिवसीय जयमलजी म.सा. यांचा जन्मोत्सवास 6 सप्टेंबर पासून उत्साहात सुरूवात झाली.

येथील स्वाध्याय भवनात जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्य श्री पार्श्वचंद्रजी म.सा. आणि अनुप्पेहा ध्यान प्रणेता डॉ. पदमचंद्र मुनी आदीठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. आचार्यश्री जयमल जी म.सा. यांची जयंती अत्यंत मोठ्या स्वरुपात साजरी होत आहे. सकाळी आचार्यश्री पार्श्वचंद्रजी म.सा यांच्या महामांगलीकाने जयमल जाप सुरू झाला. त्यात शेकडो श्रावक श्राविका ड्रेस कोड व फेट्यासह सहभागी झाले होते. 7 व 8 रोजी जैन हिल्स येथे जन्मजयंतीचे विविध भरगच्च कार्यक्रम होत आहेत त्यास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनी यांनी प्रवचनातून केले.

आजच्या प्रवचनामध्ये जयमलजी महाराज व धुरंधरजी महाराज यांच्या बाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. धोवन पाणी व मिश्र पाणी याबद्दल विवेचन दिले. पूर्वी चुल्हा चौका चालू होता. चुल्ह्याला शांत करणे, त्याला पूर्णपणे विझविणे हे अशुभ मानले जाई त्यामुळे चुल्हा पेटलेलाच असे. आताच्या परिस्थितीत तसे दिसत नाही. 60 वर्षांपूर्वी बहुतांश जैन साधु रेल्वे लाईनच्या शेजारी असलेल्या पायवाटेने विहार करत असत. त्यावेळी कोळसा इंजिन होते. त्याचा वेगही कमी असे. रेल्वे इंजिनमध्ये बसणारे कर्मचारी साधु गणांना पाणी गरम करून देत असत. आता काळानुसार सर्वच बदलले आहे.

गुप्तदानाचे महत्त्व देखील त्यांनी आपल्या प्रवचनात सांगितले. ‘गुप्त दिले तसे गुप्त मिळते ही !’ या उक्तीनुसार दान केल्याचे फायदे त्यांनी सोदाहरण सांगितले. दान करताना ते सत्पात्री दान होईल याचे भान ठेवावे. जेथे पाप आहे तिथे दान द्यायचे नाही व त्याची अनुमोदना करायची नाही. धर्माच्या कार्यामध्ये आपण सदैव तत्पर असायला हवे असे आवाहनही डॉ. पदमचंद्र मुनीजी यांनी केले.

पूज्य जयमलजी महाराज यांचे चरित्र, कार्य कसे प्रेरणादायी होते या बाबतचे त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक घटना, प्रसंग त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून उपस्थित श्रावक-श्राविकांना सहज सांगितले. 300 वर्षांनंतर देखील त्यांचे चरित्र आजही प्रेरणादायी ठरलेले आहे. उपवास, जप आराधना, पारणा या विषयी देखील त्यांनी प्रवचनात प्रकाश झोत टाकला.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.