चार संसारी ‘प’ दुःखकारक तर आध्यात्मिक ‘प’ सुखकारक

0

लोकाध्यात्म विशेष लेख  

प्रवचन सारांश  –  2 ऑगस्ट 2022

संसारात सुख चार आहेत, तर दुःख हजार आहेत. जन्म, व्याधी (रोग) आणि जरा (म्हातारपण) ह्यामुळे संसारात दुःख प्राप्त होतात. याबाबतचे अनेक उदाहरणे आजच्या प्रवचनात दिले गेले. संसाररुपी चार ‘प’ अर्थात पैसा, पत्नी, पुत्र आणि पद हे दुःखकारक आहेत. जीवनात सुख प्राप्ती करायची असेल तर ‘प्रवचन’, ‘प्रत्याख्यान’, ‘प्रतिक्रमण’ आणि ‘पौशद’ ह्या चार ‘प’ चा स्वीकार करणे अत्यंत आवश्यक आहे असे आवाहन पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांनी आजच्या प्रवचनात केले.

आगम प्रवचन श्रुंखलेत ते बोलत होते. या प्रवचना आधी ‘मेरी भावना’ या प्रवचन मालिकेत सुरू असलेल्या कालच्या प्रवचनाचा संदर्भ घेत सुश्राव्य प्रवचन केले. जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्यश्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा. अणुप्पेहा ध्यान प्रवर्तक डॉ. पदमचंद्रमुनी आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात जळगाव येथील स्वाध्यायभवन येथे चातुर्मास सुरू आहे.

संसाररुपी ‘प’ दुःखदायक कसे असतात त्यावर भाष्य करताना एका गावातील चार मित्रांची गोष्ट त्यांनी सांगितली. एका गावातील चार मित्र होते. चौघांपैकी कुणाला पैसा, कुणाला पत्नी, कुणाला पुत्र तर कुणाला पद मिळावे अशी इच्छा असते. त्यांच्या गावी सिद्धपुरूष येतात. ते सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात असे त्यांचे वैशिष्ट्य त्यांना कळते व त्यांच्या दर्शनार्थ ते जातात. चौघांनी त्या सिद्ध पुरुषाचे दर्शन घेतले व आपापल्या जे हवे त्या इच्छा व्यक्त केरतात. चौघांना समजावण्यात येते की, पत्नी, पैसा, पुत्र आणि पद हे दुःखदायक असतात. परंतु असे असले तरी आम्हाला वरदान द्या असा आग्रह चौघांनी धरला. त्या चार ही जणांना जे जे हवे होते ते मिळाले परंतु ते समाधान झाले नाही, त्यांना दुःख मिळाले. या उलट आध्यात्मिक चार ‘प’ म्हणजे ‘प्रवचन’, ‘प्रत्याख्यान’, ‘प्रतिक्रमण आणि पौशद यांचा स्वीकार केला तर ते सुखकारक असते. आध्यात्मिक ‘प’ चा स्वीकार करून जीवन उत्तमातील उत्तम बनवा असे आवाहन आजच्या प्रवचनात केले.

‘मेरी भावना’ या प्रवचन मालेत स्वार्थत्यागातून दुसऱ्यांचे कल्याण करावे असे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनींचे सुशिष्य पू. जयपुरंदरमुनी यांनी केले. स्वार्थ व परमार्थ भाव असलेल्या चार प्रकारचे व्यक्ती असतात. त्याबाबत त्यांनी मेरी भावना रचनेतील ‘निज-पर के हित-साधन में जो, निश-दिन तत्पर है।, स्वार्थ त्याग की कठीण तपस्या, विना खेद जो करते है।’ या ओळींचे विश्लेषण ते प्रवचनात करत होते. स्व व पर कल्याण साधणारे 4 प्रकारचे लोक असतात. पहिले जे स्वचाच विचार करतात, दुसरे जे स्व चा विचार न करता दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करतात, तिसरे जे आपल्या व समोरच्याही कल्याणाचा विचार करत नाहीत. चौथे मात्र स्व कल्याण तर साधतच असतात परंतु पर कल्याण देखील साध्य करतात. साधू साध्वीचे जीवन परोपकारमय असते म्हणून ते वंदनीय असतात. संसारात गृहास्थाश्रमात राहून देखील स्व कल्याणा बरोबर पर कल्याणाची कृती करू या असे आवाहन प्रवचनात करण्यात आले.

—– ¤¤——

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका आजपासून दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here