देवाचे सख्य

0

“देव माझा आणि मी देवाचा” अशी भावना तयार होणे, त्यातून देहबुद्धीचा ऱ्हास होणे. म्हणजेच देवाशी सख्य निर्माण होण्याची प्रक्रिया सुरु होणे समर्थ एका ठिकाणी याचे वर्णन करतात.

देहबुद्धी नेणो काही ।
दास अंकित रामापायी॥

देवाच्या चरणाशिवाय दुसरे काहीही न सुचणे म्हणजे अंतर्बाह्य देवाचेच होणे मग मी देवाचा आणि देव माझा असाच संबंध स्थापित होणे म्हणजेच सख्य भक्ती यामध्ये सर्वच गणगोत नातेवाईक मित्र मंडळी यांच्या स्थानी हि देवाचं अधिष्ठान दिसू लागते इतकी एकरूपता देव आणि भक्तांमध्ये तयार होते.

कृष्ण माझी माता । कृष्ण माझा पिता।
कृष्ण माझा गुरु। कृष्ण माझा सखा।

अशी अवस्था म्हणजे सख्य भक्तीचा आविष्कार देव मनात बसला कि मग संपूर्ण मनाचे, देहाचे नियंत्रणच देवाचे होते. प्रत्येक कृती ईश्वराची होते आणि भक्त विश्वात्मक व सर्वव्यापी ईश्वराचे सख्य अनुभवतो. त्यासाठी सर्व काही देवाचे आहे हा भाव असणे गरजेचे आहे. रज, तम, सत्व अशा तीन गुणांची रचना देहासोबतच केलेली आहे. देह पंचमहाभूतांचा आणि अंगीभूत रचना रज, तम सत्व या गुणांची अशी एकंदरीत चौकट आखूनच मानव प्राण्याची मार्गक्रमण होत असते. रजोगुणानेच मानव निर्मिती झाली म्हणून त्याची आवश्यकता आहे. मग तमोगुणी मानव हा अध्यात्मिक मार्गक्रमानेत तमोगुण मागे टाकूनच येऊ शकतो. या कमी तम् सारून सत्वाचे आचरण करणे गरजेचे ठरते, म्हणून सत्व गुणी मानव हाच अध्यात्मिक मार्गाचे पालन करतो अथवा आध्यत्मिक मार्गाने सत्वगुणाची वाढ होऊन तम आणि रज गुण कमी होतात जगतगुरु तुकाराम महाराज आपल्या गुरुपदाच्या अभंगात सांगतात.

रज तम सत्व आहे ज्याचे अंगी।
याच गुणी जगी वाया गेला ॥

याची पुढील रचना सांगताना ते म्हणतात..
तम म्हणजे काय नरकाची केवळ।
रज तो सबळ मायाजाल।
तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य।
करावीशी परमार्थ अहर्निशी ॥

सत्व गुणांची जेव्हा रज आणि तम गुणांवर मात होते. तेव्हा सात्विक भक्तीचा अविष्कार होतो आणि मग देह बुद्धी विसरून भक्ती मार्गाने परमेश्वराशी एक रूप होतो, हीच अवस्था सख्य निर्माण करणारी असते. सख्य भक्ती म्हणजे पराकोटीची साधना जी सातत्याने, भक्तिभावाने, निष्ठेने करायची आहे. त्यासाठी मनाचा निग्रह व कोणत्याही प्रसंगात निष्ठा ढळणार नाही. एवढी प्रखर साधना असणे आवश्यक ठरते. या एकरूपतेनेच माता, पिता, बंधू, सखा सर्वकाही देवच एवढा समर्पित अनुभव भक्त अनुभवतो हे महत्वाचं..

जय जय रामकृष्ण हरी

प्रा. नितीन मटकरी
विष्णू नगर जळगाव
९३२६७७८३२

Leave A Reply

Your email address will not be published.