अवघा रंग एक झाला

0

संत सोयराबाई यांचा हा अभंग यातील शब्द रचना ह्या भगवत भक्तीला एका वेगळ्याच उंचीवर नेणारी आहे. संत चोखामेळा यांच्या अर्धांगिनी म्हणजे संत सोयराबाई त्यांच्या एकूणच चरित्रामध्ये त्यांच्या वाट्याला आलेली जातीय विषमता आणि त्यात झालेली होरपळ, गरिबी या सगळ्या विपरीत परिस्थितीत भगवंतचे प्रति अपार श्रद्धा, भक्ती आढळ निष्ठा कायम ठेवून भगवंताची आळवणी, विनवणी त्यांनी केली त्या निरक्षर असूनही त्यांनी रचना केलेले अभंग त्यांच्यातील अलौकिक प्रतिभेचा आविष्कारच म्हटलं पाहिजे. मंगळवेढ्याच्या गावकुसाबाहेर उपेक्षितांचे जीवन जगताना सुद्धा भगवंताचे प्रति अनन्य भाव, भक्ती कायम ठेवणाऱ्या संत सोयराबाई ह्या खऱ्या भगवत भक्तीला त्या प्रत्येक अभांगातून “चोख्याची महारी” सोयरा असाच उल्लेख करीत असत.

उपजत कर्ममेळा । वाचे विठ्ठल सावळा।
करी साहित्य सामग्री । म्हणे चोख्याची महारी ॥

आपल्या पदरी आलेल्या या उपजत स्थितीला ना शरण जाता काया, वाचा, मने याद्वारे विठ्ठलाचे नामस्मरण कायम ठेवूनच सर्व जीवनावश्यक साहित्याची सामग्री मी जमविली अशी ग्वाही सोयराबाईंनी दिली आहे. उपेक्षितांचे जीणे त्यामुळे गाव कुसाबाहेर जातीच्या भेदामुळे लांब आणि परिस्थीचे चटके अशी अवस्था भोगलेल्या सोयराबाई विठ्ठलाच्या दर्शनाने सर्वच भेद मिटतात आणि अवघच रंग एक होतो असे म्हणतात.

अवघा रंग एक झाला।
रंगी रंगला श्रीरंग ॥

संत चरित्रामध्ये सर्वच संतांच्या वाट्याला उपेक्षा, हेटाळणी, छळ प्रसंगी अपमान हे आले पण त्यांनी या सर्वांवर प्रेम, करुणा, वात्सल्य ह्या गुणांनीच मत केली व आपली भगवत भक्ती कायम ठेवली म्हणून सोयराबाई पुढे म्हणतात.

मीतू पण गेले वाया ।
पाहता पंढरीच्या राया॥
नाही भेदाचे ते काम ।
पळोनि गेले क्रोध काम॥

मी तू पणाची बोळवण झाल्याने आता सर्वांचा रंग एकच आणि तो म्हणजे विठ्ठल म्हणून भेद उरला नाही आणि कामक्रोधादि दुर्गुणांची सर्वच बाबतीत झालेली हद्दपारी हीच मोठी रवानगी आहे. म्हणून आता फक्त भगवत भक्तीचा रंगच उरला.

पाहते पाहणे गेले दूरी ।
म्हणे चोख्याची महारी॥

ज्यावेळी संतांच्या मनातून आर्ततेने भगवंतची आळवणी होते, त्यावेळी निर्माण होणारी अभंग रचना ही भक्तांच्या मनाची सर्व कवाडे उघडणारी असते भेद संपतो आणि त्यावेळी अवस्था हि “अवघा रंग एक झाला” अशीच असते.

जय जय रामकृष्ण हरी

प्रा. नितीन मटकरी
६ पुतळा पार्क अपार्टमेंट
विष्णू नगर जळगाव
९३२६७७८३२९

 

Leave A Reply

Your email address will not be published.