Tuesday, May 24, 2022

शरण आल्या गौळणी

शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांनी रचलेल्या गौळणी ह्या भक्ती रसाचा गोडवा अधिकच वाढवण्यासोबतच परमेश्वराशी सर्वार्थाने एकरूप करणारी संत साहित्यातील अभूतपूर्व रचना आहेत यामध्ये प्रामुख्याने भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे गोकुळातील वास्तव्य याला अनुसरून एकूणच सर्व काव्यात्मक मांडणी आहे तसे म्हटले तर कृष्ण अवताराचा अभूतपूर्व असा महिमा भगवंताच्या भक्ती रसात ओतप्रोत भरून भक्तांना तल्लीन करणारा आहे. भगवंताचा गोकुळातील अवतार आणि त्यानंतर त्यानी केलेल्या लीला आपल्या बासरीच्या स्वरांनी गौळणी, सवंगडी, मित्र याना घातलेली मोहिनी त्यातून यासर्वाशी भगवंताचे भक्ती, प्रेमयुक्त नाते आणि त्यातून फुललेले कृष्णा चरित्र हा संत महतांसोबतच अनेकांना मोहरून आणि भारावून टाकणारा विषय आहे.

गौळणीच्या माध्यमातून कृष्ण लीला संतांनी, गीतकार व साहित्यिकांनी मांडल्या यातून घडलेला कृष्ण भक्तीचा आविष्कार व कृष्ण चरित्राचे दर्शन हे अद्भुत आहे, तेवढेच रसाळही आहे त्याचे रसपान करणे हाही एक अमृतानुभवाचं आहे. गोकुळातील दही दूध लोणी आणि भगवंताचे बालपण हा भाग गौळणीतून सांगताना संत मग शेवटी कृष्णाची भगवंत रूपात मांडणी करतात आणि आपला भाव भक्तिपूर्ण करून भगवंताच्या चरणी लिन करवून घेतात हे गौळणीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांची रचना बघा..

मठात भरुनी दही दूध लोणी।
बारा तेरा जणी।
निघाल्या मथुरेला गौळणी ॥
चढताना तो मथुरा घाट ।
घाटामधली अवघड वाट।
कसा अचानक आडवा येतो ।
कान्हा झुड्पातूनी ॥
निघाल्या मथुरेला गौळणी ॥

ह्या गौळणी नंतर भगवान कृष्णाला विनवणी करून आपला मार्ग सोडण्यास सांगतात त्या विनंती मधला गर्भित अर्थ म्हणजे आपली सर्वांची मोहमायेतून सॊडवणूक हाच आहे म्हणून ते शेवटी म्हणतात..

हात जोडुनी शरण आल्या।
एका जनार्दनीं ।
निघाल्या मथुरेला गौळणी ॥

शेवटी शरण जावे भगवंतला हाच संदेश आपल्याला मिळतो हे या रचनांचे विशेष आहे संसारवाट अवघड आहे, त्यातून मार्ग म्हणजे भगवंतास अनन्य भावाने शरण जाणे आणि आत्मिक बळ मिळवणे हा संदेश देणारी ही रचना संतांनी आपल्या उद्धरासाठी केली त्यासाठी रूपक योजिले कृष्ण लीलांचे याचा बोध आपण घेऊ व वाटचाल करूया..

कृष्णम वंदे जगत्गुरुं

प्रा. नितीन मटकरी
जळगाव
९३२६७७८३२९

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या